मराठा आंदोलनाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या दोन दिवसांच्या परभणी दौऱ्यावर आहेत. परभणी संवाद बैठकीत मनोज जरांगेंनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे. देवेंद्र फडणवीसांना माझे खुले आव्हान आहे. देवेंद्र फडणवीसांनी हिंमत असेल तर आठ दिवस माझ्याशेजारी बसून उपोषण करावे. मग तुम्हाला कळेल की उपोषण म्हणजे काय असते, हवा कुठून बाहेर जाते आणि कुठून श्वास घेता येतो. वजन कमी करायचे असेल तर या माझ्या बाजूला आणि उपोषण करा, असे आव्हान जरांगे यांनी फडणवीस यांना दिले आहे.
मी मरेपर्यंत माझ्या बांधवांना साथ देणार आहे. तसेच सगेसोयऱ्यांची मागणी सोडणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आपल्याइतका सन्मान कुणीच केला नसेल. त्यांनी 30 दिवस मागायचे आपण 40 दिवस द्यायचे. त्यांनी दोन महिने मागायचे आपण अडीच महिने द्यायचे, त्यांनी एक महिना मागायचा आपण दीड महिना द्यायचा. त्यांनी तीन महिने मागायचे आपण साडेतीन महिने द्यायचे आपण त्यांचा कुठलाही शब्द खाली पडू दिला नाही. मात्र सरकारने आरक्षण दिलं का? तर नाही दिले. माझ्या मराठा समाजाची फसवणूक केली. तरीही मराठा समाजाला वाटतं आहे की मराठा समाजाला एकनाथ शिंदेच आरक्षण देऊ शकतात. ते शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या नादाने काय म्हणतात? मनोज जरांगेशी मला घेणेदेणे नाही. जो असं करतो त्याचा करेक्ट कार्यक्रम करतो. मी पण सांगितलं जो असं बोलतो त्याचा करेक्ट कार्यक्रम मराठा समाज करतो. एकनाथ शिंदेंची इतकी इज्जत मराठा समाजात होती. मी बोललो होतो देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे कशाला मधे बोलले? काय दिलं तुम्ही? 75 वर्षे मराठा समाजाला मराठा आरक्षण मिळालेले नाही. मराठ्यांनी या नेत्यांना मोठे केले. गाड्या, घोड्या, बंगले, यांची मुले परदेशात, मराठ्यांना काय मिळाले, असा सवाल जरांगे यांनी केला.
देवेंद्र फडणवीसांना माझे खुले आव्हान आहे. देवेंद्र फडणवीसांनी हिंमत असेल तर आठ दिवस माझ्याशेजारी बसून उपोषण करावं. मग तुम्हाला कळेल की उपोषण म्हणजे काय असतं, हवा कुठून बाहेर जाते आणि कुठून श्वास घेता येतो. वजन कमी करायचं असेल तर या माझ्या बाजूला आणि उपोषण करा. गृहमंत्री म्हणून म्हणालात की आई बहिणींची भाषा मी वापरली. माझा त्यांना सवाल आहे दोन वर्षांच्या मुलीच्या पायात गोळी शिरली होती. ती आई बहीण वाटली नाही? तुम्हाला काय करायचं ते करा मी आरक्षण घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आमच्या आया बहिणींना नीट चालता येत नाही. लाठीचार्जमध्ये त्यांच्या पायांवर डोक्यांवर वार झाले आहेत. तेव्हा आई-बहीण दिसली नाही का? तुमची मराठ्यांविषयीची नियत आम्हाला दिसली, असेही जरांगे म्हणाले.
फडणवीसांच्या डोक्याला आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही
हिंगोली येथील दौऱ्यात जरांगेंनी पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. एसआयटी चौकशी नेमल्यावरुन संताप व्यक्त करत, मराठे तुमच्या डोक्याला आयुष्यभर गुलाल लागू देणार नाहीत, अशा शब्दात जरांगेंनी फडणवीसांवर टीका केली. महायुती सरकारने मराठा समाजाला दिलेले 10 टक्के आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणारे नाही. राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटी चौकशीवर बोलताना, दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या, पण तसे होणार नाही. बारा बलुतेदार असू द्या, गोरगरीब जनता असू द्या, सगळे गुतणार. पण, मराठे भीतच नाहीत गुतायला. तुम्ही एसआयटी नेमलीय ना, आता राज्यात दुषित वातावरण झालंय. नाराजीची प्रचंड लाट आली आहे, तुम्हाला भावनिक लाट काय असते, आणि आयुष्यात केलेली चूक किती महागात पडेल हे फडणवीसांच्या लक्षात येणार आहे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष्य केले आहे. तसेच, कायम राजकीय आयुष्यातून बरबाद होणार, तुम्ही किती खुनशी आहात हे आम्हाला माहिती आहे. पण, मराठे एवढे खुनशी आहेत की, आयुष्यभर तुमच्या डोक्याला गुलाल नाही लागू देणार, असेही जरांगे यांनी म्हटलं आहे.