निवडणुकीपूर्वी जरांगे पाटील 900 एकरमध्ये घेणार जंगी सभा

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे, त्याचबरोबर सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकवटणार असून, तब्बल 900 एकरवर जंगी सभा घेणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी बीड जिल्ह्यात ही विराट सभा होणार असल्याचे संकेत मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत.

राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यावरही राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणखीच तापला आहे. सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण फसवे असून, ते कोर्टात टिकणार नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटल आहे. तसेच आम्हाला ओसीबीमधूनच आरक्षण पाहिजे या भूमिकेवर जरांगे ठाम आहेत. सरकारने सगेसोयरे शब्दाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेचा वापर करून गुंडशाही आणि दडपशाही सुरू केली आहे. त्यामुळे कोट्यवधी मराठा समाज पुन्हा एकवटणार असल्याचे जरांगेंनी म्हटले आहे. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी सध्या संवाद दौरा सुरू केला असून, या दौर्‍यांतर्गत ते बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी भेटी देऊन मराठा समाजबांधवांशी संवाद साधत आहेत.