सरकारने मर्यादा तोडल्या तर करेक्ट कार्यक्रम करणार! – जरांगे-पाटील

देवेंद्र फडणवीस यांचे ऐकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचा करेक्ट कार्यक्रम करा असे म्हणतात. पण सरकारने मर्यादा तोडल्या तर मराठा समाजच त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार, असा इशारा मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी आज दिला. मराठय़ांचा लढा हा राजकारण म्हणून बघू नका, लोकसभा निवडणुकीला उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय माझा नसून मराठा समाजाचा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथे जरांगे यांची आज सभा झाली. मराठा समाजालाओबीसीमधूनच आरक्षण मिळाले पाहिजे असे सांगतानाच आता पह्न आला किंवा केला तर फक्त आरक्षणावरच बोलायचे, असे जरांगे म्हणाले. मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय एक इंच मागे हटणार नाही, असे सांगतानाच, आपण घरावर तुळशीपत्र ठेवल्याने सरकार आपले काहीही करू शकत नाही, असे जरांगे म्हणाले.

माझ्या नादाला लागू नका, नाहीतर तुमचा टांगा पलटी

माझ्या नादाला लागू नका. नाहीतर तुमचा टांगा पलटी करू, आरक्षणाच्या विरोधात बोलले की वाजवलेच, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, असा इशाराही जरांगे यांनी दिला. आपल्या मागे कोणतेही नेते नाहीत तर मराठा समाज आहे, असेही त्यांनी सांगितले. सगेसोयऱयांबाबत सरकारची काही दिवस वाट बघू, असेही ते म्हणाले.