मराठा आरक्षण आंदोलकांकडून लोकसभा निवडणुकीसाठी हजारोच्या संख्येने उमेदवार उभे करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उमेदवारांची संख्या वाढल्यास निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करावे, असे पत्र धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी निवडणूक आयोगाला लिहिले आहे.
मनोज जरांगे पाटील हे गेल्या आठ महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत.
राज्यातील मिंधे सरकारने वेळोवेळी मराठा आंदोलकांची फसवणूक केली. जे मागितलेच नाही ते दहा टक्के आरक्षण मराठा समाजावर थोपण्याचा प्रयत्न केला जात असून, त्यामुळे मराठा समाजात प्रचंड असंतोष आहे. सरकारला धडा शिकवण्यासाठी म्हणून लोकसभेच्या निवडणुकीत प्रत्येक गावातून किमान दोन मराठा आंदोलक निवडणुकीला उभे करण्यात येणार आहेत. मतदान यंत्राच्या क्षमतेपेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणूक घ्यावी लागेल. पण मतपत्रिकेवर निवडणूक घ्यायची तर सगळी यंत्रणाच वेगळ्या पद्धतीने कामाला लावावी लागेल. त्यामुळे योग्य ते मार्गदर्शन करण्यात यावे, असे पत्रच धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी राज्याचे निवडणूक आयुक्त एस. चोक्कलिंगम यांना लिहिले आहे.
धाराशिव जिल्ह्यात 736 गावे असून, बार्शी आणि औसा तालुक्यात दीडशेपेक्षा जास्त गावे आहेत. मतदारसंघाची रचना पाहता ३८४ पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घ्यावी लागेल. मतपत्रिकेचा आकारही वाढणार आहे. त्यामुळे मतपेट्यांचा आकारही वाढवावा लागणार आहे. त्याचबरोबर मतपेट्या मतदान केंद्रावर पाठवणे, तेथून स्ट्राँग रूमपर्यंत आणणे यासाठीही अतिरिक्त वाहने लागणार आहेत. मतपेट्या सुरक्षित ठेवण्यासाठीही जागा अपुरी पडणार आहे. निवडणूक प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यास येणार्या अडचणी आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात येत असून, योग्य ते मार्गदर्शन करण्यात यावे, असे या पत्रात म्हटले आहे.