मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या सरकारच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत मराठा समजाला पुढाऱ्यांना फिरकू न देण्याचे पोस्टर लावण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले आहे. सरकारने मराठा आरक्षण आंदोलकांवर खोटे आरोप करून त्यांच्यावर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल करणे सुरू केले आहे. त्यामुळे मराठा समाजात नाराजी वाढत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच भाषा बोलू लागले आहेत, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या संदर्भात कोणीही मर्यादा सोडल्यास त्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करू, असे इशारा दिला होता. त्यावर जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचा चांगलाच समाचार घेतला. मराठा आरक्षण ओबीसीतून मिळण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आपण सहा महिने वाट पाहिली. मराठा आरक्षण ओबीसीतून देण्याऐवजी दहा टक्के स्वतंत्र आरक्षणाच्या अधिसूचनेचा मसुदा प्रसिद्ध केला. त्यात सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी नाही. उलट करेक्ट कार्यक्रम करण्याची धमकी देण्याची भाषा मुख्यमंत्री शिंदे हे बोलत असलेली ही भाषा देवेंद्र फडणवीसांची आहे, असा आरोप जरांगे यांनी केला. मात्र मराठा समाजच सरकारचाच ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
जरांगे यांनी सोलापूर जिल्ह्यात करमाळा, मोहोळ, बार्शी आदी भागात दौरे करून सभा घेतल्या. सर्व सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठा आरक्षण आंदोलन दाबून टाकण्यासाठी पोलीस आता आंदोलनाचे उभारलेले फलक काढत आहेत. यात पोलिसांना दोष देता येणार नाही तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याच सांगण्यावरून मराठा आंदोलनाचे फलक काढले जात आहेत. फडणवीस यांच्या पोटात मराठा समाजाच्या आंदोलनामुळे दुखू लागले आहे, असाही आरोपही जरांगे यांनी केला. आज सार्वजनिक जागेवरील फलक काढले जातील. पण आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर प्रत्येक मराठा व्यक्तीने आपापल्या घराच्या दरवाजावर, कोणत्याही पुढाऱ्याने मते मागण्यासाठी आमच्या घरात येऊ नये, असे भित्तीपत्र लावावेत. घरावर लावलेले पोस्टर काढून टाकण्याची हिंमत कोणाचीही होणार नाही, असेही ते म्हणाले.