पुढाऱ्यांनी माझ्या दारात यायचे नाही, असे पोस्टर घरावर लावा; समाजाला आवाहन करत मनोज जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला महत्त्वाचे आवाहन केले आहे. पुढाऱ्यांना आपल्या दारात येऊ द्यायचे नाही, असे पोस्टर आपल्या घरावर लावा, असे जरांगे म्हणाले आहेत. एक पेपर घ्यायचा. त्यावर मोठ्या अक्षरात लिहायचे, मी मतदार, पुढाऱ्यांनी माझ्या दारात यायचे नाही, असे लिहून ते पोस्टर दाराला चिटकवून टाका. उद्यापासून राज्यात ही मोहिम सुरू करा. आपल्या दुचाकी, चारचाकीला तसेच पोस्टर चिटकवायचे. आता ते मते मागायला अमेरिकेत जाणार का? असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

सोलापूरमधील वैरागमध्ये मनोज जरांगे पाटलांची सभा झाली. ते म्हणाले की, मराठा आरक्षणाचा लढा शेवटच्या टप्प्यात आला आहे. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी गोरगरिब मराठा एकत्र आला आहे. आज देऊ, उद्या देऊ करत करत सरकारने मराठ्यांचे 3 महिने घालवले. त्यानंतर मराठ्यांनी चलो मुंबईची हाक दिली. ओबीसी कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी अधिसूचनेची गरज होती. एवढ्या मोठ्या कायद्यात दुरुस्ती करायची त्यामुळे अधिसूचना होणे गरजेचे होते. हरकती मागवण्याची तारीख 16 होती. अधिवेशन 15 ला होणार होते. 10 तारखेला उपोषण का सुरू केले असा काहींचा प्रश्न होता. याचे उत्तर देतो. 16 तारखेपर्यंत सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणीची वाट बघितली असती आणि 15 तारखेला अधिवेशन होऊन गेले असते तर अधिसूचनेचा विषय कशातच घेतला नसता. 10 तारखेला आमरण उपोषण सुरू केल्यामुळे सरकारला 15 चे अधिवेशन 20 तारखेला घ्यावे लागले हे उपोषणाचे यश होते. 20 तारखेला विधानसभेच्या पटलावर सरकारला सगेसोयरेबाबत चर्चा करावी लागली. त्यामुळे अधिसूचनेचाही पटलावर नोंद झाली. 15 ला अधिवेशन झाले नसते तर हे पटलावर आले नसते, असेही जरांगे म्हणाले.

अधिसूचना मुख्यमंत्र्यांच्या हातातून घेतली. आता सरकारने वेगवेगळे डाव टाकायला सुरुवात केली. मी बोललो ते खूप लागले. मी काही वाईट बोललो नाही. कोट्यवधी मराठे सहा महिने लढतायेत. त्यांच्यावरील अन्याय सहन करू शकत नाही त्यामुळे तळपायाची आग मस्तकात गेली. तुमच्याशी मित्रत्व करण्यासाठी आंदोलन उभे केले नाही तर जातीसाठी उभे केले आहे. माझ्या अंतरवालीतील आई बहिणींची डोकी फुटली तेव्हा तुम्हाला का वाईट वाटलं नाही. नेत्याला बोललो म्हणून तुटून पडले, असा हल्लाबोलही जरांगे यांनी केला.