महिलांच्या पदराआड लपून आपल्यावर हल्ला करण्याचा कट असून यामागे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसच असल्याचा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला. एसआयटी चौकशी काय करायची असेल ती कराच आणि हिंमत असेल तर मला अटकही करा असे आव्हानही जरांगे यांनी दिले.
गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन मनोज जरांगे हे दोन दिवसांपूर्वी आंतरवाली सराटीत परतले. दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर रविवारपासून त्यांनी आपल्या राज्यव्यापी दौर्याला सुरुवात केली. बीड, भूम येथे त्यांनी मराठा समाजाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली. गृह खाते हे अत्यंत जबाबदारीचे आहे. परंतु गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोलिसांचे कान फुंकण्याचे काम करत आहेत. मराठा आंदोलनाचे पोस्टर, बॅनर काढण्यात येत आहेत. आता निवडणुका आहेत. तुमचे पोस्टर, बॅनर गावागावांत कसे लागतात तेच आम्ही बघू, असा इशारा त्यांनी दिला.
राजकीय नेत्यांना बंदी
मराठा आरक्षणावर मिठाची गुळणी धरलेल्या राजकीय नेत्यांना मराठा कार्यकर्त्यांनी आपल्या दाराशी उभेही करू नये. गाड्यांवरही असेच फलक लावा. एकदा होऊनच जाऊ द्या. दडपशाही करून जुने गुन्हे उकरून कार्यकर्त्यांना उचलण्यात येत आहे. मराठा समाजात दहशत पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही मनोज जरांगे यांनी केला.
फडणवीस म्हणजे कान फुंकणारी आत्या
मराठा कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. गावागावांत लावण्यात आलेले आंदोलनाचे पोस्टर, बॅनर काढण्यात येत आहेत. मराठा आंदोलन दडपा असा पोलिसांवर दबाव आहे. हा सगळा कट फडणवीसांचा आहे. तेच पोलिसांचे कान फुंकत आहे. ग्रामीण भागात मुलाचे नाव ठेवताना आत्या त्याचे कान फुंकते. फडणवीस म्हणजे अशी कान फुंकणारी आत्या असल्याचा टोला मनोज जरांगे यांनी लगावला.
मला अटक करून दाखवाच
देवेंद्र फडणवीस यांना फोडाफोडीचे राजकारण चांगले करता येते. आता मराठा आंदोलनातही फोडाफोडी करण्याचे पाप त्यांनी केले आहे. आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा झाली आहे. मी तर वाटच पाहतोय, कधी होणार चौकशी? फडणविसांच्या आमदारांनी मला अटक करण्याची मागणी केली. मला अटक करून दाखवाच, मराठा काय चीज आहे हे तुम्हाला कळेल, असा गर्भित इशारा मनोज जरांगे यांनी दिला.