महाराष्ट्रातील सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बळीराजा देशोधडीला लागला आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ठोस तरतूद केली नाही. धान, कापूस, सोयाबिन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. महागाईमुळे शेतकरी पिचला आहे. शेतमालाला हमीभाव नाही. परंतु घोटाळेबाजांना मात्र या राज्यात चांगले दिवस आले असल्याचे टीकास्र विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी डागले आहे. त्याचबरोबर अपात्र अधिकाऱ्याना हवे ते पद देऊन सरकार हवी ती कामे करून घेत आहे. महत्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात नाहीत. या मनमानीमुळे राज्य अधोगतीकडे निघाले आहे. अशा शब्दात वडेट्टीवार यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत.
वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात आहे. मराठा विदर्भात गंभीर परिस्थिती आहे. तरी देखील सरकारची डोळेझाक सुरू आहे. राज्यात घोटाळ्यांची मालिका सुरू आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातील घोषणांची अंमलबजावणी नाही. विदर्भातील, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची, जनतेची फसवणूक केली आहे. शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घोटाळा, ठाणे येथील मोघरपाडा मेट्रोच्या कामात घोटाळा, रेट काँन्ट्रॅक घोटाळा, मिठागरांच्या जमिनींबाबतचा घोटाळा, जल जीवन मिशन घोटाळा, साडी घोटाळा, मोबाईल घोटाळा अशा घोटाळ्यांची मालिका राज्यात सुरू असून सरकारने या घोटाळ्यांमधील दोषींवर कारवाई केली पाहिजे. अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.