‘मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सुरू केल्यानंतर मी त्यांची भेट घेतली होत़ी त्यानंतर आजपर्यंत जरांगे यांच्याशी मी एक शब्ददेखील बोललेलो नाही अथवा आमची कोणतीही भेट झालेली नाही. अशा वेळी जबाबदारीच्या पदावर बसलेले लोक इतके पोरकट बोलतात, हे मी महाराष्ट्राच्या आजवरच्या इतिहासात कधीच पाहिलेले नाह़ी त्यांचे वक्तव्य पोरकटपणाचे आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारले.
बारामती लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या आढावा बैठकीनंतर शरद पवार पत्रकारांशी बोलत होत होते. ‘मनोज जरांगे-पाटील हे शरद पवार यांनी दिलेली स्क्रिप्ट वाचत आहेत,’ असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. आंदोलनाच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’ नेमण्याची घोषणा सरकारने केली आहे. यावर पवार म्हणाले, ‘काय वाटेल ती चौकशी करा. आमचे आणि मनोज जरांगे यांच्यासह त्यांच्या सहकाऱयांचे पह्न तपासा. माझ्या पह्नवरून एक जरी पह्न केल्याचे सिद्ध झाले असेल तर तुम्हाला वाटेल ती गोष्ट मी मान्य करेन. कर नाही त्याला डर कशाला! आमचा या सगळय़ाशी काहीही संबंध नाही.’
14 निवडणुकांमध्ये अडकून पडलो नाही, आता काय अडकवणार?
बारामती लोकसभामतदारसंघात आपल्याला अडकवून ठेवण्याचा प्रयत्न आहे का? या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, ‘लोक मनोभावे सहकार्य करताहेत. बारामतीमधून आतापर्यंत मी 14 निवडणुका लढलो. सात निवडणुका लोकसभेच्या होत्या. तेव्हा अडकून राहिलो नाही, हे आता काय अडकविणार?’ असा जोरदार हल्ला त्यांनी विरोधकांवर केला. सुनेत्रा अजित पवार यांच्या संभाव्य उमेदवारीबद्दल ते म्हणाले, ‘निवडणुकीमध्ये कोणालाही उभे राहण्याचा अधिकार आहे. आमच्यासाठी समोर नवीन उमेदवार मिळाला याचा आनंद असेल.’
‘मर्यादित मेंदूचा माणूस’
मनोज जरांगे पाटील यांना आपण बीडमधून लोकसभेची उमेदवारी देणार आहात का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर शरद पवार यांनी’एवढी आमच्यावर वेळ आली आहे का?’असं मिश्किल उत्तर दिलं. त्याचवेळी हा दावा कुणी केलाय, असा पत्रकारांना प्रश्न केला. पत्रकारांनी भाजपचे आशिष देशमुख यांचं नाव घेतल्यावर त्यांनी’मर्यादित मेंदूचा माणूस’ असे फटकारले. ज्यांचा मेंदू मर्यादित आहे, त्यांच्याबद्दल अधिक काय बोलणार. असे पवार म्हणाले.