अपशब्द वापरले असतील तर दिलगिरी व्यक्त करतो!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी वापरण्यात आलेल्या अत्यंत शिवराळ भाषेवरून चोहोबाजूने कोंडी होताच मनोज जरांगे पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली. भावनेच्या भरात आपल्याकडून अपशब्द वापरण्यात आले असतील तर ते मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो असे ते म्हणाले.

आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना जरांगे यांनी राज्यकर्त्यांविषयी शिवराळ भाषा वापरली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याला सलाईनमधून विष देऊन मारणार आहेत, अटक करून आपला एन्काऊंटर करण्याचा त्यांचा कट असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला होता. मराठा आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, त्याचे स्वागतच आहे. पण आंतरवालीत करण्यात आलेल्या लाठीहल्ल्याचीही चौकशीही करण्यात यावी, अशी आमची मागणी असल्याचे मनोज जरांगे म्हणाले.

29 ऑगस्टपासून आंतरवाली सराटी हे मराठा आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू बनले आहे. काल उपोषण थांबवून मनोज जरांगे हे उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल होताच पोलिसांनी आंतरवालीतील उपोषण मंडप, व्यासपीठ हलवण्याच्या हालचाली सुरू केल्या. हे कळताच जरांगे यांनी उपचार अर्धवट टाकून पुन्हा आंतरवालीकडे जाण्याचा निर्णय घेतला. मात्र उपविभागीय अधिकाऱयांनी उपोषण स्थळी कोणतीही कारवाई करणार नाही, असे स्पष्ट आश्वासन दिल्यानंतर जरांगे यांनी आपला निर्णय मागे घेतला.