>> मानसी पिंगळे
प्रसिद्ध गायिका वैशाली भैसणे माडे तिच्या आवाजासह फिटनेसचीही काटेकोरपणे काळजी घेते. वैशाली म्हणते, ‘‘सगळय़ांना असे वाटते की, आपण फिट दिसलो पाहिजे. पण मला असे वाटते की, आपण फिट असले पाहिजे.’’
वैशाली म्हणते, बऱयाचदा सुंदर, फिट दिसण्यासाठी अनेक जण आहारात कृत्रिमरीत्या बनवल्या गेलेल्या अनावश्यक गोष्टींवर जास्त भर देतात. ज्यामध्ये बऱयाचदा प्रोटिन्सच्या गोळय़ा, व्हिटॅमिनची औषधे अशा अनेक गोष्टी असतात. पण त्याचा निकाल तात्पुरता दिसतो. किंबहुना बऱयाचदा त्याचे दुष्परिणामसुद्धा भोगावे लागतात. महाराष्ट्रीयन जेवण हे सगळय़ात पौष्टिक. मग त्यात भात, तूप, भाज्या शरीरासाठी सगळेच उपयुक्त आहे. रोजच्या रोज घरगुती जेवल्याने वजन वाढत नाही, उलट शरीर तंदुरुस्त राहते.
वैशाली खाण्यापिण्याच्या बाबतीत ती कोणत्याही बंधनात अडकली नाही. तिच्या रोजच्या आहारात चपाती, भाजी, डाळ, भात हे सगळेच असते. रसगुल्ला हा तिचा सर्वात आवडता पदार्थ. वैशाली म्हणते, मी कामानिमित्त वेगवेगळय़ा ठिकाणी भेट देत असते आणि त्यादरम्यान मी बऱयाच ठिकाणी रसगुल्ले चाखून पाहिले, पण जी चव कोलकाता येथील रसगुल्लाला ती अजून कुठेच मिळणार नाही. वैशाली जेव्हा जेव्हा वेगवेगळय़ा ठिकाणी भेट देते तेव्हा तेथील स्थानिक पदार्थांचा आनंद लुटल्याशिवाय राहत नाही. ती सगळे खाते आणि इतरांनासुद्धा खाऊ घालते.
बाहेरचे जेवण हे जरी फार चविष्ट आणि आनंद देणारे असले तरी ते शरीरासाठी फार घातक आहे. आजकाल 12, 13 ते 18, 19 इतक्या लहान वयोगटांच्या मुलींमध्ये पीसीओडी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हेरियन हा घातक आजार आहे, जो महिलांमध्ये उद्भवणारी मासिक पाळीशीसंबधित असणारा आजार मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळतो. याचे एकमेव कारण म्हणजे वारंवार बाहेरचे खाणे, आहारात घरगुती पदार्थांचा समावेश नसणे. त्यामुळे नैसर्गिरीत्या, घरगुती पद्धतीने बनवले जाणारे पदार्थ हाच उत्तम आरोग्याचा योग्य कानमंत्र आहे. आपण फिट दिसण्यापेक्षा फिट असले पाहिजे, असे वैशाली सांगते.
शेतातली चविष्ट पंगत
वैशाली स्वादिष्ट मटण बनवते. त्यामुळे तिच्या मित्रपरिवारात तिच्या हातच्या मटणाला भलतीच मागणी आहे. ती लहान वयातच स्वयंपाक करायला शिकली. ती जितकी फूडी आहे तितकीच उत्कृष्ट स्वयंपाक बनवते. वैशालीला पारंपरिक, मराठमोळय़ा पद्धतीने बनवले जाणारे पदार्थ फार आवडतात. अमरावतीला गेल्यावर वैशालीला जेवणासाठी अनेक निमंत्रणे येतात. त्यात वैशालीच्या आवडीचे निमंत्रण म्हणजे शेतावर जाऊन अगदी पारंपरिक पद्धतीचे पदार्थ, वांगे-बटाटय़ाची भाजी, भाकर, भरलेले वांगे आणि बरेच काही.