अन्नधान्य वितरण कार्यालयाच्यावतीने मोरे वस्ती, चिखली, पिंपरी चिंचवड येथे बुधवारी छापा टाकून मामा गॅस सर्विस एजन्सीविरुद्ध गॅस सिलेंडरची अवैध साठवणूक, वाहतूक या अनुषंगाने मोठी कारवाई करत 35 लाख 73 हजार 545 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली.
या कारवाईमध्ये 4 मोठी वाहने, हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे गॅस भरलेले 105 सिलेंडर व रिकामे 602 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत आरोपी भिकचंद हिरालाल कात्रे यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कात्रे यांच्याविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात भादवी कलम 420, 285, 286 सह जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 चे कलम 3 व 7 नुसार तसेच एलपीजी (पुरवठा व वितरण आदेश) आदेश 2000 चे कलम 3 ते 7 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई परिमंडळ अधिकारी सचिन काळे, पुरवठा निरीक्षक स्नेहल गायकवाड, अमोल हाडे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय मोरे आदींनी केली आहे, असेही गिते यांनी कळविले आहे.