केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून सरकार केवळ ज्ञान देतंय, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आंबेडकर यांनी ट्विटर वरून एक पोस्ट शेअर करत केंद्र सरकारवर निशाणा साधला.
”हे सरकार केवळ ज्ञान पाजळतंय, पण देशातील तरुण, गरिब, महिला आणि शेतकऱ्यांची त्यांनी फसवणूक केली आहे. अर्थमंत्री केवळ स्वतःची पाठ थोपटून घेण्यात आणि खोटे बोलण्यात धन्यता मानत आहेत. अर्थमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे जर आपली अर्थव्यवस्थ चांगली असेल तर मागच्या नऊ वर्षांमध्ये तब्बल 12,88,293 अतिश्रीमंत व्यक्ती व उद्योजकांनी देश का सोडला? व्हायब्रंट गुजरातमधील 7,25,000 नागरिकांनी बेकायदेशीरपणे अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न का केला?” असा सवाल त्यांनी या पोस्टमधून केला आहे. तसेच सरकार जो दावा करते की लोकांचं सरासरी उत्पन्न 50 टक्क्यांनी वाढलं आहे, या माहितीचा स्त्रोत काय आहे? असा देखील सवाल आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
प्रधानमंत्री किसान योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या आणि दिलेली माहिती देखील शंकास्पद आहे, असा संशय देखील त्यांनी या पोस्टमधून व्यक्त केला आहे.