विचारा तर खरं…

>> उदय पिंगळे, अर्थ अभ्यासक

वाचकहो, आर्थिक गुंतवणुकीसह आर्थिक समस्यांसंदर्भातील तुमच्या मनातील प्रश्न, शंका [email protected] या ई-मेलवर पाठवा.

1 बाजार सर्वोच्च स्थानावर असताना प्रत्यक्ष शेअर्समध्ये किंवा म्युच्युअल फंड योजनांत एकरकमी रक्कम गुंतवावी का? – नवीन गोळे, कळवा

उत्तर ः यात गुंतवणूक करण्यामागचा हेतू म्हणजे किती कालावधीत किती परतावा मिळणे अपेक्षित आहे ते अधिक महत्त्वाचे आहे. बाजार सर्वोच्च स्थानी असो अथवा नीचांकी स्थानावर, या प्रत्येक क्षणी गुंतवणूक संधी उपलब्ध असतात. त्या शोधता येणे महत्त्वाचे आहे. कारण त्यात जोखीम अधिक आहे. त्या तुलनेत म्युच्युअल फंड योजनांत जोखीम विभागली जाते. तेव्हा आपल्या जोखीम स्वीकारण्याच्या क्षमतेनुसार थेट गुंतवणूक करायची की अप्रत्यक्षपणे ते ठरवून निर्णय घ्यावा. अनेकदा गुंतवणूक चढय़ा भावात करून मार्पेट खाली आल्यावर घाबरून विक्री केली जाते, त्यामुळे दुहेरी नुकसान होते. ते टाळण्यासाठी अर्धी गुंतवणूक एकरकमी करून उरलेली रक्कम पूर्ण गुंतवणूक होईपर्यंत प्रत्येक खालच्या लेव्हलला थोडी खरेदी आणि वरच्या लेव्हलला थोडी विक्री केल्यास सरासरी किंमत वाजवी राहायची शक्यता आहे. काही जण आपल्या गुंतवणूक संचातील फक्त वाढणाऱया शेअर्सची खरेदी करतात. या दोन्ही पद्धतींत काही गुणदोष आहेत तरीही दीर्घकाळ थांबायची तयारी असेल तर त्या उपयोगी आहेत हे सिद्ध झाले आहे. याशिवाय इंडेक्स फंडात गुंतवणूक करत राहणे हा तिसरा पर्याय होऊ शकतो. आपण या पद्धती जाणकारांकडून समजून घेऊन विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा.

2 माझ्या पतींचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर मी एक ट्रेडिंग व्यवहार केला असून त्यांच्या डी मॅट खात्याला माझे नामनिर्देशन आहे. भविष्यात हे खाते बंद करताना काही अडचण येऊ शकते का?
– अलका पाटील, उरण

उत्तर ः आपल्या निधन झालेल्या पतीच्या डी मॅट खात्यास आपले नामनिर्देशन होते, त्यामुळे त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र आणि एक फॉर्म भरून सर्व शेअर्स सहजपणे आपल्या खात्यात आले असते, त्यात कोणतीही कायदेशीर अडचण नव्हती. असे करण्याऐवजी आपण परस्पर एक व्यवहार मृत व्यक्तीच्या नावे केला आहे. त्यामुळे हा व्यवहार कसा झाला आणि कुणी केला हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. यातून मार्ग म्हणजे आपण केलेला सदर व्यवहार मृताचे नामनिर्देशित व्यक्ती म्हणून केला असून भविष्यात काही वाद उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली असेल अशा आशयाचे एक प्रतिज्ञापत्र आपल्या डीपीला देणे. यानंतर सर्व शेअर्स आपल्या खात्यात येऊन खाते बंद केले जाईल आपण आपल्या डिपॉजिटरी पार्टीसिपंटशी संपर्क साधून त्यांना नेमके काय अपेक्षित आहे त्याची पूर्तता करून द्यावी.