‘बजेट’मधून करदात्यांच्या अपेक्षा

1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर करदाते काही अपेक्षा बाळगून आहेत. दोन वर्षांपूर्वी अर्थमंत्र्यांनी नवीन कर पर्याय दिला, पण त्याचे स्वागत झाले नाही. करदात्यांना वाटतेय की, आता नवीन कर पर्यायात विमा, भविष्यनिर्वाह, गृहकर्ज किंवा उच्च शिक्षणासाठी एखादी वजावट द्यावी किंवा जुना कर पर्याय स्वीकारणाऱयाला पाच लाखांऐवजी सात लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱयाला कोणताही कर भरावा लागणार नाही असा बदल करावा. त्यासाठी पाच ते सात लाख या दोन लाखांची वजावट केवळ विमा योजना, भविष्यनिर्वाह निधीसारख्या गुंतवणुकीसाठी द्यावी. कर पर्याय स्वीकारल्यावर तो दरवर्षी बदलता येत नसल्याच्या अटींमुळे व्यवसाय करणारे अनेक करदाते जुनाच कर पर्याय स्वीकारत आहेत. जर अधिक गुंतवणूक करून कर वाचवायची संधी मिळाली तर करदात्यांना त्याचा लाभ घेता येईल.

सर्वसामान्य करदात्यांना कर विवकरणपत्र सादर करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत असते. यासाठी लागणारा फॉर्म 16 हे 15 ते 30 जूनपर्यंत मिळते. त्यामुळे करदात्यांना केवळ एक ते दीड महिना मिळतो. म्हणून एक तर फॉर्म 16 लवकर मिळण्यासाठी आवश्यक बदल करावे किंवा करदात्यांना विवरणपत्र सादर करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवून मिळावी. कर परतावा उशिराने मिळाल्यास लागू होणाऱया व्याजाचा दर 6 टक्क्यांवरून 7 टक्के केल्यास करदात्याचे नुकसान होणार नाही.