>> अश्विन बापट
वडिलांच्या खांद्याला खांदा लावून केक फॅक्टरीचा उचलतेय भार
श्रेया कचरे. विशीतली तरुणी. एमबीए करून नोकरीत स्थिरस्थावर होत असतानाच तिने बाबांच्या के. के. फूड्सला जॉइन व्हायचे ठरवले आणि आज दीड वर्षांनी श्रेया बाबांच्या खांद्याला खांदा लावून या केक फॅक्टरीचा मोठा भार उचलतेय. पंपनीचे अकाऊंटिंग, मॅन मॅनेजमेंटपासून कस्टमर्सशीदेखील तीच करतेय.
श्रेयाच्या वाटचालीबद्दल तिच्याकडून जाणून घेतले. ती म्हणाली, बाबा पैलासचंद्र कचरे यांनी पुण्यात के. के. फूड्स कंपनी 2018 मध्ये सुरू केली होती तेव्हा केक हे आमचे एकमेव उत्पादन होते. दोन वर्षे सारे काही ठीक होते, पण 2020 मध्ये कोरोना आला आणि त्या काळाने आर्थिक फटका बसला व आम्हाला पंपनी बंद करावी लागली. तरीही या व्यवसायाबद्दल प्रेम, आस्था होतीच. पुढे कोरोना जसा कमी झाला, तसा बाबांनी पुन्हा या व्यवसायात पाय रोवायचे ठरवले. त्यांनी याकरिता पूर्ण सर्व्हे केला, बारकाईने अभ्यास केला. मुंबईत येऊन त्यांना कंपनी सुरू करायची होती. त्यामुळे इथल्या ग्राहकांच्या आवडीनिवडी यासारखे घटक विचारात घेत 2022 मध्ये मुंबईत ही पंपनी सुरू केली. एव्हाना मी ग्रॅज्युएशन आणि एमबीए पूर्ण करून जॉबही करू लागले होते. पण इथे बाबांचा कामाचा व्याप जसा वाढू लागला, तसे त्यांना या व्यवसायात साथ देणे हे मला आवश्यक वाटले. मग आर्थिक समतोल साधण्याची खात्री आम्हाला पटल्यावर मी त्यांना या कंपनीत जॉइन केले आणि आता दीड वर्ष मी त्यांच्यासोबत काम करतेय.
दिवसाला आठ ते नऊ हजार केक तयार केले जातात. गेल्या वर्षी ख्रिसमस काळात म्हणजे 25 डिसेंबर ते 1 जानेवारी या काळात एक लाख केकचे उत्पादन आणि विक्री करण्यात आली.
या व्यवसायात विविध स्वभावाच्या, आवडीनिवडीच्या लोकांशी संपर्क येतो, त्यांच्याशी संवाद साधावा लागतो. यामुळे माझा पेशन्स वाढण्यास मदत झालीय, असेही श्रेयाने आवर्जून सांगितले. तसेच येणाऱया वर्षभरात आईस्क्रीम, डोनट्स, क्रीम रोल आणि ब्रेड ही आमची नवी उत्पादने बाजारात आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असाही मानस तिने बोलून दाखवला.
मोदक-चॉकलेट केकची खासियत
नवी मुंबईच्या तुर्भेमध्ये पावणे एमआयडीसीमध्ये आमचे प्रॉडक्शन युनिट आहे. जिथे 200 कर्मचारी आहेत. आमच्याकडे 22 प्रकारचे केक मिळतात. ज्यात चॉकलेट केक ही आमची खासियत आहे. याशिवाय मोदक केक हीदेखील एक्स्कलुझिव्ह व्हरायटी आहे. ज्यामध्ये काजूकतली सारणासह अन्य पदार्थ असतात. मोदकाच्या आकाराच्या या केकला लोकांची खूप मागणी येत असते, असे श्रेया म्हणाली. याशिवाय वेफर्स आणि प्लम केक्सही आम्ही विक्री करतो. आमची उत्पादने मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या तीन ठिकाणी विक्रीला जातात. जवळपास 175 शॉप्समध्ये आमची उत्पादने विक्रीसाठी जातात.
(लेखक एबीपी माझाचे सीनिअर प्रोडय़ूसर-सीनिअर न्यूज अँकर आहेत.)