संगमनेर तालुक्यातील आणि लोणी जवळील सादतपुर येथे बुधवारी रात्री मध्यरात्री आणखी एका बिबट्यास पिंजऱ्यांत जेरबंद करण्यात अखेर वनविभागास सहा दिवसानंतर यश आले. धुमाकूळ घालणारा दुसरा बिबटया जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला असला तरी या परिसरात बिबट्यांची दहशत अद्याप कायम आहे.
सोमवारी जेरबंद झालेला बिबटया 7 वर्षांचा नर जातीचा होता. तर बुधवारी मध्यरात्री जेरबंद झालेला बिबटया मादी असून पाच वर्षांची आहे. गत 15 दिवसांत दुसरा बिबटया वनखात्याच्या जाळ्यात अडकला आहे. 25 जानेवारीस एक पाच वर्षाचा चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडला होता. तत्पूर्वी लोणीत लहामागे कुटुंबीयातील नऊ वर्षाच्या मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. एकापाठोपाठ घडलेल्या या घटनेमुळे लोणी व सादतपूर परिसरात खळबळ उडाली होती. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने सादतपुर परिसरात विविध ठिकाणी पिंजरे लावून तसेच ड्रोनद्वारे बिबट्याचा शोध घेत होते. सोबत वनखात्याचेअधिकारी व कर्मचारी ठाण मांडून होते.
दोन दिवसांच्या अंतराने दुसऱ्या बिबट्यास पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभाग आणि रेस्क्यू टीमला यश मिळाले आहे. मात्र परिसरात बिबट्याची दहशद कायम असल्याने ‘ऑपरेशन बिबटया’ ही मोहीम सुरुच राहणार आहे. सदर मोहिमेत सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी सौ सुवर्णा माने, कोपरगाव वनपरिक्षेत्र अधिकारी श्री सागर केदार, नाशिक रेस्क्यू टीमचे अभिजीत महाले , संतोष पारधी, पोलिस पाटील सुनिल मगर, प्राणीमित्र विकास म्हस्के व वनविभागाचे कर्मचारी हजर होते.
‘ऑपरेशन बिबटया’ मोहीम सुरूच राहणार !
दोन दिवसांपूर्वी जेरबंद झालेला बिबटया हा नर जातीचा तर बुधवारी रात्री जेरबंद झालेला बिबटया मादी होती. सोबत हसनापूर रस्त्यावर अज्ञात वाहनांच्या धडकेत ठार झाले बछडे यांचा एकत्रित विचार केल्यास बिबट्याचे संपूर्ण कुटुंबच येथे वास्तव्यास होते. मात्र आणखी बिबटे येथे वास्तव्यास असू शकत असल्याने वन विभाग ‘ऑपरेशन बिबटया’ ही मोहीम सुरूच ठेवणार आहे.
—