एसटी महामंडळाचे वाहनतळ आता चकाचक होणार आहेत. सध्या वाहनतळांची दुरवस्था झालेली असल्याने येथे येणाऱया बसबरोबरच प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने आपल्या वाहनतळांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पुणे, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर विभागातील बस स्थानकांचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाने निविदा मागविल्या असून 18 कोटींहून अधिक खर्च केला जाणार आहे.
एसटीच्या नियोजनानुसार पहिल्या टप्प्यात पुणे विभागातील घोळेगाव बसस्थानकाची पुनर्बांधणी व भोर बसस्थानक व आगार वाहनतळ काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. सोलापूर विभागातील अकलूज, करमाळा, कुटुंबाडी, टेंभुर्णी येथील बसस्थानकाच्या बाहनतळाचे काँक्रीटीकरण केले जाणार असून त्यासाठी सुमारे 6 कोटी 39 लाख रुपये खर्च येणार आहे. सातारा विभागातील पाचगणी व वाई येथील बसस्थानकाच्या वाहनतळाचे, कोल्हापूर विभागातील गगनबावडा व मलकापूर येथील बसस्थानकाच्या वाहनतळाचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे.