केंद्रातील भाजप सरकारकडून देशभरात द्वेष आणि हिंसाचार पसरवला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी येथे केला. गोरगरीब आणि युवकांच्या हिताकडे साफ दुर्लक्ष करून सरकार मोठय़ा उद्योगसमूहांसाठी काम करते आहे. या देशव्यापी अन्यायाविरुद्धच्या लढय़ात बंगाल आणि बंगाली जनतेने नेतृत्व करण्यासाठी उतरावे, असे आवाहनही त्यांनी येथे प्रचंड जनसमुदायाला केले.
दोन दिवसांच्या अल्पविरामानंतर सिलिगुडी येथून काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला प्रारंभ झाला. केंद्र सरकारकडून प्रत्येक ठिकाणी युवकांची थट्टा सुरू आहे, असा दावा करताना त्यांनी सैन्यदलातील भरतीसाठी आणलेल्या अग्निवीर योजनेचा उल्लेख केला. अशी अल्पकालीन भरती योजना सुरू करून सशस्त्र दलात सामील होऊ इच्छिणाऱया तरुणांची सरकारने थट्टाच केली आहे, असे ते म्हणाले.
द्वेष आणि हिंसाचाराने कोणताही हेतू साध्य होत नसतो. त्याऐवजी सरकारने तरुणांना, लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले पाहिजे; पण प्रत्यक्षात सरकार लोकांऐवजी कंपन्यांसाठी काम करते आहे, असे ते एका गाडीच्या टपावरून लोकांशी संवाद साधताना म्हणाले.
प. बंगालला विशेष स्थान
पश्चिम बंगालच्या लोकांनी मला खूप प्रेम दिले आहे. बंगालला विशेष स्थान आहे. बंगालने स्वातंत्र्यलढय़ात वैचारिक लढा दिला. रवींद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस आणि स्वामी विवेकानंदांनी देशाला मार्ग दाखविण्याचे काम केले होते. मला विश्वास आहे की, तुम्ही सर्वजण या देशाला पुन्हा एकत्र जोडण्यासाठी सक्रिय व्हाल, असे ते म्हणाले.
राहुल गांधींमुळे पंतप्रधानांना झोप येत नाही
डेहराडून ः पंतप्रधान मोदींच्या स्वप्नात नेहरूजी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी येतात. राहुल गांधींमुळे तर मोदींना झोप येत नाही. हे लोक घाबरले आहेत, असा हल्ला चढवत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज येथून काँग्रेसच्या लोकसभा निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला. या ‘विराट कार्यकर्ता संमेलनात’ खरगे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर प्रश्न उपस्थित करत आसाममध्ये भारत जोडो न्याय यात्रेवर झालेल्या हल्ल्यावरून आसाम सरकारवरही हल्लाबोल केला. काँग्रेसच्या लोकांनी तुरुंगवास भोगला आणि देशासाठी बलिदानही दिले. भाजपच्या लोकांनी काय केले, असा प्रश्न त्यांनी विचारला.