नवी मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून तळ ठोकून बसलेल्या लाखोंच्या मराठा फौजेपुढे खोके सरकारची अक्षरशŠ दाणादाण उडाली. आझाद मैदानात जाण्यासाठी मराठा आंदोलक आक्रमक झाल्यामुळे सरकारने नमते घेत मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्वच मागण्या मान्य केल्या. कुणबी नोंदी सापडलेल्या 57 लाख मराठय़ांना ओबीसी प्रमाणपत्र देण्याचे मान्य करत सरकारने कुणबी नोंदी असलेल्या मराठय़ांच्या सग्यासोयऱयांनाही ओबीसी सवलतींचा लाभ देण्याची घोषणा सरकारने केली. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रात्रभर जोर, बैठका आणि खलबते सुरू होती. आज सकाळी जात प्रमाणपत्रासंदर्भातील सुधारित अधिसूचनेचा मसुदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना सुपूर्द केला आणि जरांगे यांनी शुक्रवारपासून सुरू केलेले उपोषण मागे घेतले. त्यानंतर लाखो मराठा बांधवांनी वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात विजयाचा गुलाल उधळून जल्लोष केला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून मराठा आंदोलनकांनी मुंबईच्या दिशेने कूच केली होती. राज्याच्या कानाकोपऱयातून आलेल्या या मराठा आंदोलकांच्या फौजा गुरुवारी मध्यरात्री नवी मुंबईत येऊन डेरेदाखल झाल्या. शुक्रवारी जरांगे लाखो आंदोलकांसह मुंबईच्या आझाद मैदानाकडे कूच करणार होते. मात्र शुक्रवारी सकाळी शासनाच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेतली. त्यानंतर जरांगे यांनी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर सभेला संबोधित केले. सरकारने आपल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र कुणबी म्हणून ज्या 57 लाख नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या सग्यासोयऱयांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मुद्दा सरकारने मान्य केला असला तरी त्याचा अध्यादेश काढण्यात आलेला नाही, यावर जरांगे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा अध्यादेश जर काढला नाही तर शनिवारी दुपारी बाराच्या नंतर मराठा आंदोलक आझाद मैदानाकडे कूच करतील, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आणि आपले उपोषण सकाळी 11 पासूनच सुरू झाले असल्याचे त्यांनी जाहीर केले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यानंतर जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत आज उपोषण सोडले.
उधळलेल्या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका,जरांगे यांनी सरकारला ठणकावले
राज्यात 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यापैकी 37 लाख मराठय़ांना ओबीसी प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहे. ज्या नोंदी सापडल्यात त्यांच्या सग्यासोयऱयांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश सरकारने काढल्यानंतर आम्ही विजयाचा गुलाला या वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात उधळला आहे. या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका, अशा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाशी येथील विजयी सभेत दिला.
सरकारने आता सर्वच मागण्या मान्य केल्या आहेत. हा आपल्या एकजुटीचा विजय आहे. यापुढे अशी एकजूट आपली राहिली पाहिजे. ओबीसी आणि मराठा गावागावांत गुण्यागोविंदाने राहात आहेत. मात्र ओबीसींचे नेते आमच्यात भांडणे लावण्याचे कारस्थान आता करू लागले आहेत. मराठा समाजाने केलेल्या सर्वच मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. या ठिकाणी आम्ही जो विजयाचा गुलाल उधळला आहे त्याचा मान राखण्यात यावा, त्याचा अपमान होऊ देऊ नका, असेही त्यांनी यावेळी सरकारला ठणकावले.
मराठय़ांच्या नादी लागू नका!
मराठा आरक्षण मुद्दा सध्या न्यायालयात आहे. जोपर्यंत त्यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीच्या सवलती देण्यात याव्यात. कुणबी नोंदी आढळणाऱयांच्या सग्यासोयऱयांचे सर्वेक्षण करताना जिथे लग्नाची सोयरीक जुळते तो निकष ग्राह्य धरण्यात यावा. ज्यांच्या नोंदी आढळणार नाहीत त्यांच्याकडून शपथपत्र करून घेण्यात यावे. या शपथपत्राचा खर्च एक हजारावरून कमी करावा आदी सूचनाही जरांगे यांनी यावेळी सरकारला केल्या. तुम्ही ठोकलेले सर्वच खुटे आता उपटले आहेत. त्यामुळे यापुढे मराठा समाजाच्या नादी लागू नका, असा इशाराही त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱयांना दिला.
या मागण्या झाल्या मान्य
– राज्यभरात 57 लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. त्यापैकी 37 लाख लोकांना प्रमाणपत्र दिले गेले आहे. त्यांचा तपशील मिळणार.
– नोंदी मिळालेल्या सर्व लोकांच्या परिवारास कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार.
– शिंदे समिती रद्द करू नका ही मागणी मान्य. या समितीची मुदत सरकारने चार महिन्यांने वाढवली आहे.
– सग्यासोयऱयांना प्रमाणपत्र देण्यात यावे, त्यासाठी अध्यादेश काढण्यात आला.
– ज्या मराठा बांधवाकडे कुणबी नोंद नाही, त्यांना शपथपत्राच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार
– अंतरवाली सराटीसह मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेणार.
– मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती होणार नाही. भरती केलीच तर मराठय़ांसाठी जागा राखीव ठेवणार.
– क्युरेटिव्ह पिटीशनचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. ते आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजातील सर्वांना शिक्षण मोफत मिळणार
कुणबी नोंदी सापडलेल्या मराठय़ांना आणि त्यांच्या सग्यासोयऱयांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश सरकारने काढला आहे. मराठा समाजाने केलेल्या सर्वच मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी. या ठिकाणी आम्ही जो विजयाचा गुलाल उधळला आहे त्याचा मान राखण्यात यावा, त्याचा अपमान होऊ देऊ नका. दगाफटका केला तर थेट आझाद मैदानात येऊन बसेन. मी आंदोलन संपवलेले नाही, स्थगित केले आहे.
सरसकट आरक्षण मिळणार नाही
मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिले जाणार नाही. ज्या मराठय़ांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांनाच ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
सगेसोयरेचा निकष कायदेशीर नाही
झुंडशाहीने कायदे-नियम बदलता येत नाही. सगेसोयरेचा निकष कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही. ओबीसींवर अन्याय केला जातोय की, मराठय़ांना फसवलं जातंय, याचा अभ्यास करावा लागेल, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली