देशात रामराज्य नसून ‘पलटूरामा’चे राज्य आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केली आहे. बिहारमधील फोडाफोडीचे भाजपचे राजकारण हाच आपल्या देशातील लोकशाहीला मोठा धोका आहे, असेही ते म्हणाले.
शिवसेना नेते खासदार संजय राऊन आज शनिवारी छत्रपती संभाजीनगरच्या दौर्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, देशात रामराज्य नसून पलटूरामाचे राज्य आहे, पंतप्रधान हे अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्या भष्टाचारावर टीका करतात आणि 24 तासांनंतर आपल्या विधानावर पलटी मारून त्यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान देतात. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुशार यांना भाजपचे दरवाजे बंद आहेत, हात जोडून आले तरी आम्ही त्यांना आमच्या पक्षात घेणार नाही, असे अमित शाह पाटण्यात जाऊन बोलत होते. त्यावर नक्की पलटी कुणी मारली? हे रामराज्य नसून पलटूरामाचे राज्य आहे, अशी टीका खासदार राऊत यांनी यावेळी केली. रामराज्याची व्याख्या समजून घेतली पाहिजे. रामराज्य आले असते तर मनोज जरांगे पाटील यांना लाखो लोकांना घेऊन मुंबईला मोर्चा काढावा लागला नसता. दीड वर्षात महाराष्ट्रात तीन हजार शेतकर्यांना आत्महत्या कराव्या लागल्या नसत्या, देशामध्ये बिहार आणि उत्तर प्रदेशतील 10 लाख तरुणांना रोजगारासाठी इस्रायलला जावे लागले नसते, याला राम राज्य म्हणता येणार नाही, असेही ते म्हणाले.
मराठा, धनगर समाजांच्या आरक्षण प्रश्नावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण काही दिवसांपासून तणावाखाली होते, ढवळून निघाले म्हणा. मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा साधा माणूस लाखो लोकांना घेऊन मुंबईकडे निघाला. ज्या प्रश्नांसाठी लढा सुरू आहे, ते प्रश्न सुटावेत ही सगळ्यांची, राजकारणापलीकडे जाऊन आमचीही भूमिका आहे. यावर नक्की तोडगा निघायला हवा. मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्या मुद्द्यांवर उपोषण सोडले आहे. मराठा समाजाला सगेसोयरे-सरसकट कुणबी दाखले द्यावेत, हे त्यांचे मुख्य मुद्दे आहेत, सरकारने काढलेल्या आदेशानुसार हे मुद्दे नक्की मार्गी लागतात का? हे काही दिवसांत आपल्याला कळेल. पुन्हा याच मुद्द्यांवर मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करायला लावू नये, असेही ते म्हणाले. याप्रसंगी शिवसेनेचे राज्य संघटक चेतन कांबळे यांची उपस्थिती होती.