राज्य सरकारच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने मुद्रांक कोषागारात शिल्लक असलेले आणि वापरा योग्य नसलेले कोटय़वधींचे मुद्रांक (स्टॅम्प पेपर) मुंबई महानगरपालिकेच्या परवानगीने वरळी स्मशानभूमीत जाळले, मात्र हा सारा प्रकार रात्रीच्या अंधारात स्मशानशांततेत गुपचूप केल्यामुळे संशयाचा धूर निघाला आहे.
वापरा योग्य नसलेले सरकारी दस्तावेज किंवा मुद्रांक अशा गोष्टी जाळताना सरकारी नियमाप्रमाणे त्याची रीतसर माहिती स्थानिक प्रशासनाला, महानगरपालिकेला तसेच पोलिसांनाही दिली जाते. त्या दस्तावेजांना जाळताना त्याचे पह्टोग्राफी आणि व्हिडीओग्राफी केली जाते. तसेच ही कागदपत्रे दिवसात प्रकाशात जाळली जातात, पण मुंबईच्या प्रधान मुद्रांक कार्यालयाचे मुद्रांक जिल्हाधिकारी पांडुरंग मगदूम यांनी पाठवलेले मुद्रांक हे रात्रीच्या अंधारात जाळल्याने परवानगी घेऊन केलेल्या मुद्रांक अग्निसंस्काराभोवती संशयाचा धूर पसरला आहे. याबाबत माहिती मिळताच शिवसेनेचे विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, वरळी विधानसभेचे युवासेना उपविभाग अधिकारी अभिजित पाटील, शाखाप्रमुख जिवबा केसरकर, संकेत सावंत आणि रूपेश घाग यांनी घटनास्थळी जात जाळपोळीची माहिती घेतली.
सखोल चौकशीची मागणी
मुद्रांक विभागातून कोटय़वधी रुपयांचे मुद्रांक बारीक तुकडे करून गोण्यांमध्ये सीलबंद करून आणल्याचे मुद्रांक कार्यालयाच्या पत्रात म्हटले आहे, मात्र हे तुकडे किती गोण्यांमध्ये भरून आणले होते? मुद्रांक जाळताना त्याचे नियमानुसार चित्रण का केले गेले नाही? मुद्रांक जाळण्याची परवानगी पालिकेने दिली असताना सोबत पालिकेचे अधिकारी का नव्हते, असे अनेक प्रश्न अभिजित पाटील यांनी केले असून याप्रकरणी तत्काळ सखोल चौकशी करावी अशी मागणी केली आहे.