मुंबईचे आर्थिक, औद्योगिक महत्त्व कमी करून भविष्यात मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान सुरू आहे. मुंबईतील अनेक मोठे उद्योग, आर्थिक आणि राष्ट्रीय संस्था दुसऱ्या राज्यात खेचून नेल्या जात आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेस धक्का देणाऱ्या आक्रमणाचा शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात निषेध करण्यात आला आणि मुंबईकर व मराठी माणसाच्या अस्मितेसाठी प्राणपणाने लढण्याचा निर्धार या महाअधिवेशनात करण्यात आला.
शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनात तीन ठराव मांडण्यात आले.
मराठी माणसासाठी लढणार
1 मुंबईकर व मराठी माणसांसाठी प्राणप्रणाने लढण्याचा ठराव शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी मांडला. शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी अनुमोदन दिले.
मराठा, धनगर आरक्षणाचा ठराव
2 मराठा तसेच धनगर आरक्षणाबाबतचा ठराव खासदार राजन विचारे यांनी मांडला. या ठरावाला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अनुमोदन दिले. सरकारने शेतकरी, कष्टकरी, उद्योग, रोजगार याबाबत घेतलेल्या चुकीच्या भूमिकांतून आरक्षणाची समस्या उद्भवली असल्याचे नमूद करीत महाराष्ट्रातील बिघडत चाललेल्या सामाजिक वातावरणाबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर सकल मराठा तसेच धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीस पाठिंबा देताना ओबीसींसह इतर कोणत्याही वर्गाच्या आरक्षणास हात न लावता मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी पूर्ण करावी, असा ठराव झाला.
कामगारांसाठी ठराव
3 कामगारांच्या हिताच्या दृष्टीने ठराव आमदार ऍड. अनिल परब यांनी मांडला. आमदार सचिन अहिर यांनी अनुमोदन दिले. सामाजिक सुरक्षा 2020, व्यवसायी सुरक्षा आरोग्य आणि कार्य परिस्थिती संहिता 2020, औद्योगिक संबंध संहिता 2020, वेतन 2019 हे कायदे तसेच महाराष्ट्रातील कामगार व कर्मचारी यांच्या कंत्राटी भरतीसाठी मंजूर केलेली अधिसूचना तत्काळ रद्द करावी. सरकारी सेवेसाठी नोकरभरती ही कायमस्वरूपी आणि राज्य लोकसेवा आयोगातर्फेच करावी यामध्ये कोणत्याही प्रकारे खासगी व्यक्ती वा संस्थांना निवड प्रक्रियेत सहभागी करून घेऊ नये असाही ठराव करण्यात आला.
मुंबई व महाराष्ट्रासाठी ठराव
महाराष्ट्र हे हिंदुस्थानातील एक अग्रगण्य राज्य आहे. महाराष्ट्राची राजधानी म्हणून मुंबईस देशात व विदेशात महत्त्व आहे. जागतिक आर्थिक उलाढालीचे केंद्र म्हणून मुंबईस खास स्थान आहे. मुंबईतील उद्योग, व्यापार यामुळे देशाच्या तिजोरीत दरवर्षी अडीच लाख कोटींची भर पडते. देशाचे पोट भरण्याचेच काम मुंबई करते. मुंबईवर मराठी माणसाचा अधिकार राहावा यासाठी संयुक्त महाराष्ट्र लढय़ात 105 हुतात्म्यांनी बलिदान केले. शिवाय मुंबई व मराठी माणसाचा स्वाभिमान कायम राहावा यासाठीच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. त्यामुळे मुंबई व मराठी माणसाच्या अस्मितेसाठी प्राणपणाने लढण्याचा निर्धार या ठरावाद्वारे व्यक्त केला.