नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप नेत्यांना कितीही उमाळा सध्या आला असला तरी बोस कुटुंबीयांनी मात्र संघ परिवाराला दोन हात दूरच ठेवले आहे. आजच्या 126 व्या जयंतीदिनी शहीद मिनार येथे संघाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासही, नेताजींच्या सर्वसमावेशक विचारसरणीशी संघाची विचारधारा जुळत नसल्याचे सांगत, बोस कुटुंबाने नकार दिला. नेताजींना खरोखरीच आदरांजली अर्पण करायची असेल तर संघाने प्रथम त्यांना सुभाषबाबूंचे धर्मनिरपेक्ष आणि सर्वसमावेशक विचार मान्य असल्याचे जाहीर करावे, असे आवाहनही नेताजी कन्या अनिता पाफ यांनी जर्मनीतून प्रसृत निवेदनाद्वारे केले होते.