राज्यातील तलाठी पदाच्या भरतीमध्ये झालेल्या घोटाळाप्रकरणी काँग्रेसने आज दुपारी पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर स्थानकात रेल्वे रोको आंदोलन केले. अचानक काँग्रेस कार्यकर्ते रेल्वे ट्रकमध्ये लोकलसमोर उतरल्याने सुमारे अर्धा तास लोकल वाहतुकीचा गोंधळ उडाला. तलाठी भरती घोटाळय़ाची एसआयटी चौकशी करून घोटाळय़ामागील सूत्रधार शोधा, अशी प्रमुख मागणी करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम रेल्वेची वाहतूक दुपारी तीनच्या सुमारास रोखली. ‘राज्य सरकार हाय हाय’, ‘घोटाळेबाजांना पाठीशी घालणाऱया राज्य सरकारचा निषेध असो’ अशा घोषणा देत अचानक दादर स्थानकातील फलाट क्रमांक एकवर उतरत बोरिवलीच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक रोखली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या गोंधळाचा लोकल वाहतुकीला फटका बसला. दरम्यान, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी आंदोलनकर्त्यांना तत्काळ रेल्वे रुळावरून बाजूला करून रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली.