मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांना घेऊन मुंबईकडे कूच केली आहे. मराठा आंदोलक ज्या प्रकारे मुंबईकडे येत आहेत त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांचे कौतुक केले आहे. ट्विटरवरून एक पोस्ट शेअर करत त्यांनी मराठा आऱक्षणाबाबत आपलं मत मांडलं तसंच पुरोगामी महाराष्ट्रात जाती-धर्मावरून फूट पाडण्याचे डावपेच यशस्वी होणार नाहीत, असं देखील त्यांनी भाजपला सुनावलं आहे.
”मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाज ज्या पद्धतीने मुंबईकडे मार्गक्रमण करतोय आणि वाटेत सर्व जाती-धर्माच्या लोकांचा त्याला पाठिंबा मिळतोय, ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. देशात एकिकडे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असताना, सरकारमधील नेत्यांकडून जातींमध्ये भांडणं लावली जात असताना मराठा समाजाने आरक्षणाविषयी आपली भूमिका आणि कृतीला अजिबात भरकटू दिलेलं नाही. पुरोगामी महाराष्ट्रात जाती-धर्मावरून फूट पाडण्याचे डावपेच कदापी यशस्वी होणार नाहीत. आरक्षण हा संवैधानिक अधिकार आहे. कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला हा हक्क सामंजस्याने आणि कायदेशीर मार्गाने मिळावा, हीच अपेक्षा”, असे ट्विट जरांगे यांनी केले आहे.