देशात दडपशाहीचे राजकारण सुरू आहे. सुमार 95 टक्के ईडी, सीबीआय आणि आयकर खात्याच्या नोटीस या विरोधी पक्षातील लोकांना पाठवल्या जात आहेत. हा संसदेतील अधिकृत डेटा आहे. त्यामुळे आमची भाषणे धारदार झाली किंवा आम्ही विरोधात बोललो तर आम्हाला आइसकडून नोटीस येतात, असा हल्लाबोल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर केला आहे.
रोहित पवारांना ईडीची नोटीस आली आहे त्याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमच्या कुटुंबाला ईडी,सीबीआय आणि आयकर खात्याच्या नोटीस येतात, त्यात आम्हाला नवीन वाटत नाही. भाजपकडे आमच्यावर टीका करायला काही राहिले नाही. भ्रष्टाचारमुक्त आणि काँग्रेसमुक्त भारत करू असे भाजपनेते म्हणत होते. पण काँग्रेसचे किती नेते भाजपत गेलेत याचा आढावा घ्या. त्यामुळे काँग्रेस संपवायला निघालेल्या भाजपने त्यांचे किती नेते त्यांच्या पक्षात अथवा सहकारी पक्षात घेतलेत हे सर्वांनी पाहिले.
मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी मुंबईला येण्याचा इशारा आधीच दिला होता. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लीम समाजाच्या आरक्षणाचा विषय सोडवला असता तर आज सरकारवर हा दिवस आला नसता. राज्याचे सरकार आणि गृहमंत्र्यांनी आंदोलनातून मार्ग काढण्याची तयारी केली असेल बघूया पुढे काय होते, असेही त्या म्हणाल्या. आरक्षणाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संवेदनशील आहे. सरकारने कुठला कायदा आणला तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आमचा नाही. आम्ही विरोधात आहोत. हा सरकारने हाताळायचा विषय आहे. त्यांच्याकडे 200 आमदार आहेत आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे त्यांनाच कायदा सुव्यवस्थेबाबत विचारले पाहिजे, असेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.