मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे आंदोलनासाठी निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांचे पाथर्डी तालुक्यात ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. तालुक्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग भगव्या टोप्या व भगवे पंचे घातलेल्या हजारो मराठा बांधवांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेला होता. रॅलीनेपाथर्डी तालुक्याच्या हद्दीत प्रवेश केल्यापासून ते हद्द सोडेपर्यंत जरांगे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. तनपुर वाडी येथे महामार्गाच्या दुतर्फा गावांच्या हद्दीत रांगोळी काढण्यात आली. फटाकड्याच्या आतिशबाजीसह डीजे, ढोल ताशे लेझीम पथकासह हजारोच्या संख्येने मराठा बांधव रॅलीत सहभागी झाले होते. मिरवणुकीमध्ये महिलांचाही मोठा सहभाग होता.
पाथर्डी शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने क्रेनच्या साह्याने भव्य हार घालून स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी जेसीबीतून फुलाचा वर्षाव जरांगे यांच्यावर करण्यात आला. आमदार मोनिका राजळे यांनी फुंदे टाकळी फाटा येथे समर्थकासह हजर राहून पुष्पहार घालून जरांगे यांचे स्वागत केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) गटाचे नेते ॲड. प्रताप काका ढाकणे यांनी फुंदे टाकळी फाटा येथे पुष्पगुच्छ देऊन जरांगे यांचे स्वागत केले. गेल्या आठ दिवसापासून जरांगे यांच्या रॅलीच्या स्वागताची तयारी तालुक्यात सुरू होती. पाथर्डी तालुक्याचे हद्दीत मिडसांगवी येथे सकाळी हजारो वाहणाच्या ताफ्यासह हजारो मराठा बांधवांची रॅली पोहोचली. परिसरातील नागरिकांनी चहा बिस्किटे पोहे अशी नाश्त्याची व्यवस्था केली होती.
फुंदे टाकळी फाटा येथे कोरडगाव सह परिसरातील अठरा गावांनी एकत्रितरित्या खिचडी ,पिठलं भाकरी व गोडधोड जेवणाची व्यवस्था केली होती. आगसखंड व वाळूंजच्या सीमेवर दुलेचांदगाव, कासार पिंपळगाव, हंडाळवाडी, तनपुरवाडी, कामत शिंगवे, हात्राळ, वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना , मढी , धामणगाव, पाडळी, केळवंडी, मोहोज खुर्द, माळेगाव सांगवी, वाळुंज, माणिकदौंडी, वडगाव, माळी बाभुळगाव, मोहोज, देवढे वसुजळगाव अशा विविध गावांनी जेवणाचे व पिण्याच्या पाण्याचे स्टॉल लावले होते.
ॲड. प्रताप ढाकणे मित्र मंडळाकडून शहरासह रस्त्यावर विविध ठिकाणी पिण्याचे पाण्याचे स्टॉल लावले होते. गोकुळ दौंड यांच्या दिपाली प्रतिष्ठानकडून पिण्याच्या पाण्याचा स्टॉल लावण्यात आला होता.तालुक्यात मीड सांगवी, खरवंडी, टाकळी फाटा, आगसखांड फाटा, तनपुर वाडी, पाथर्डी शहर, माळी बाभुळगाव, निवडुंगे, तिसगाव, करंजी अशा विविध ठिकाणी जरांगे यांची जंगी स्वागत करण्यात आले. रस्त्यात ठिकठिकाणी जरांगे पाटील यांचे औक्षण करण्यासाठी महिला भगिनी दिवसभर उभ्या होत्या. जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी स्वागताची फलक व भगव्या झेंड्यांनी राष्ट्रीय महामार्ग सजवला होता. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दिवसभर इतरत्र ठिकाणावरून वळविण्यात आली होती. हजारो पोलिसांचा पाऊस फाटा रॅलीच्या मार्गावर तैनात होता.