राजकीय नाटकांपेक्षा ऐतिहासिक नाटके अधिक संवेदनशील झाली आहेत. ऐतिहासिक नाटकांची प्रेक्षक वाट पाहात असतात. मात्र, सोयीचा इतिहास दाखवणे, इतिहासाचा विपर्यास करणे, इतिहासातील काही खलप्रवृत्तींचे उदात्तीकरण नाटकांमधून करणे थांबवण्याची गरज आहे, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि नाटय़ संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी मांडली. रसिकांना आकर्षित करणारी नाटके रंगभूमीवर यावीत, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली.
ऐतिहासिक शंभराव्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनाची सुरूवात चिंचवड येथील श्री मोरया गोसावी संकुल येथे दिमाखदार सोहळ्याने झाली. आद्य नाटककार विष्णुदास भावे रंगमंचावर आयोजित उद्घाटन कार्यक्रमावेळी स्वागताध्यक्ष शरद पवार बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नाटय़ संमेलनाचे निमंत्रक उदय सामंत, 99व्या नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, 100 व्या नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, नाटय़ परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते. नाटय़ कलावंतांच्या आयुष्याचा विशिष्ट टप्पा गेल्यानंतर त्यांना जगणे मुश्किल होते. त्यामुळे अशा कलावंतांसाठी घरकुल योजना, मानधन वाढविले पाहिजे. तसेच ज्येष्ठ कलाकारांच्या मानधनात वाढ करावी, तिकीट दरात कपात व्हावी अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
दामलेंनी पालिकेचे काढले वाभाडे
चिंचवड येथे प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह सुरू झाले, तेव्हा त्याची देखभाल उत्तम होत होती. भाडेही कमी होते. मात्र, आता या प्रेक्षागृहाचे वीज बिल, भाडे सर्वांत जास्त आहे. मोरे प्रेक्षागृहात जेवणाला बसण्यासाठी एक हॉल आहे. मात्र, आता त्याचे 500 रुपये भाडे आकारण्यास सुरुवात केली आहे, हे दुःखदायक असल्याचे सांगत अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे अध्यक्ष, अभिनेते प्रशांत दामले यांनी नाटय़ संमेलनात महापालिकेचे वाभाडे शनिवारी काढले.
लोककलांनी सजली नाटय़दिंडी
100व्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाची नाटय़दिंडी सकाळी निघाली. यावेळी रांगोळ्यांच्या पायघडय़ा अन् ढोल, ताशा, लेझीम, गुलाबी फेटे बांधून सर्व कलाकार उपस्थित झाले होते. या कलावंतांसोबत पारंपरिक लोककला असलेल्या वासुदेव, पिंगळा, पोतराज, गोंधळी, दशावतार या लोककलाकारांच्या लोककलेने ही नाटय़दिंडी सजली होती.