>> तरंग वैद्य
सशक्त पटकथा, कुशल दिग्दर्शन, जिवंत अभिनय, हेरगिरी आणि देशभक्तीवर आधारित कथा व अप्रतिम चित्रीकरण असणारी ‘स्पेशल ऑप्स’ ही अप्रतिम वेब सीरिज. संसद इमारतीवर झालेला अतिरेकी हल्ला या घटनेभोवती संपूर्ण मालिका फिरत राहते. अत्यंत रोचक पद्धतीने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या यादीत कायम स्थान मिळवणारी ठरली आहे.
‘स्पेशल ऑप्स’, 17 मार्च 2020 ला डिस्नी हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक अप्रतिम वेब सीरिज प्रदर्शित झाली. पन्नास मिनिटांचे आठ भाग असलेली ही मालिका खूप गाजली ती सशक्त पटकथा, कुशल दिग्दर्शन, जिवंत अभिनय, हेरगिरी आणि देशभक्तीवर आधारित कथा व अप्रतिम चित्रीकरणाच्या जोरावर.
पहिला एपिसोड सुरू होतो तो वर्ष 2001 मध्ये दिल्लीत संसद इमारतीवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याने. या हल्ल्यात सहभागी पाचही अतिरेकी मरण पावतात, पण त्याआधी त्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारीमुळे अनेक सुरक्षाकर्मी आपले प्राण गमावतात. घटना अतिशय गंभीर असते त्यामुळे पडसादही तेवढेच गंभीर उमटतात. यानंतर कथेत एक वेगळेच दृश्य दाखवले जाते ज्यात मुख्य पात्र देशातील मुख्य गुप्तचर संस्था ‘रिसर्च आण्ड अॅनालिसिस विंग’ म्हणजेच ‘रॉ’चा अधिकारी हिम्मत सिंह व त्यांनी खर्च केलेल्या 28 कोटी रुपयांची चौकशी होत असते.
मालिकेची पुढची कथा या चौकशीतून अत्यंत रोचक पद्धतीने पुढे जात प्रेक्षकांना खिळवून ठेवते. 2001 साली झालेल्या संसद हल्ल्यात पाच अतिरेकी होते, पण एकटय़ा हिम्मत सिंहच्या मते सहा अतिरेकी असतात. सगळे त्याला वेडय़ात काढतात, पण तो बधत नाही. हा हल्ला जैश आणि अल कायदा या अतिरेकी संघटनांनी केला असला तरी त्याच्या लक्षात येते की, हा हल्ला आणि तेल अवीवमध्ये झालेल्या हल्ल्यात खूप साम्य आहे. त्यामुळे यात हमासची मदत किंवा सहभाग नाकारता येत नाही. मग तो विविध देशांतील आपल्या हेरांना (ज्यांना गुप्तचर संस्था ‘असेट’ म्हणतात) सािढय करतो आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार तो सगळय़ा प्रकरणाचा खुलासा तर करतोच, पण त्या सहाव्या अतिरेक्याला जेरबंद करून आपल्याला खोटे ठरवणाऱयांच्या तोंडात एक चपराकही बसवतो.
वर लिहिल्याप्रमाणे कथा छानच आहे, पण अशा पद्धतीने उलगडली आहे की, ती खूप प्रभावी वाटते. 2010 साली ही कथा मालिकेच्या रूपातून ‘स्टार प्लस’ वाहिनीवर येणार होती, पण काही कारणास्तव हे शक्य झाले नाही. जवळपास आठ वर्षांनंतर वेब सीरिजसाठी याचे चित्रीकरण सुरू झाले आणि 2020 ला ही हॉटस्टारवर रुजू झाली.
अभिनयाचे विविध पैलू दाखवत के. के. मेनन या अभिनेत्याने आपल्याला मंत्रमुग्ध करून टाकले आहे. के. के. खूप चांगला अभिनेता आहे, पण हिम्मत सिंह म्हणून त्याने अभिनयाची वेगळी उंची गाठली आहे. संसदेवर अतिरेकी हल्ला म्हणजे गुप्तचर संस्थेचे अपयश. हे अपयश धुऊन काढण्यासाठी आणि सहावा अतिरेकी होता ही खात्री पटवून देण्यासाठी त्याने दाखवलेली जिद्द अप्रतिम. शासकीय कार्यपद्धतीमुळे त्याच्या कामात अनेक वेळा अडथळा येतो तो हाताळताना त्याचा संयत अभिनय प्रभावी. मुलगी वयात आली, तिला ‘बॉयफ्रेंड’ आहे हे कळल्यावर त्यातला वडील जागा होतो तो प्रसंगही दाद देणारा. गौतमी कपूर हिम्मतच्या बायकोच्या भूमिकेत आहे, त्याला समजून घेणे, त्याला साथ देणे, बघताना असे वाटते ‘बायको असावी तर अशी.’ परमित सेठी आणि काली प्रसाद मुखर्जी चौकशी अधिकारी म्हणून उठून दिसले आहेत. मेजर पामजीत हा सशक्त अभिनेता हिम्मतच्या वरिष्ठाच्या छोटय़ा भूमिकेत आहे. कोविडदरम्यान पामजीतचे निधन झाले, त्याला मनापासून श्रद्धांजली. करण टाकर, विनय पाठक, शरद केळकर, एस. एम. झहीर, सयामी खेर, दिव्या दत्ता या नावाजलेल्या कलाकारांनी आणि इतर सर्व कलाकारांनी आपले काम चोख बजावले आहे.
मालिकेचे चित्रीकरण हिंदुस्थानात तर झाले आहेच त्याशिवाय जॉर्डन, यूएई, टर्की, अझरबाईजान या देशांतही झाले आहे. सुधीर पालसाने आणि अरविंद सिंग या दोघांची पाठ थोपटावी इतक्या सुंदर पद्धतीने त्यांनी दृश्ये आपल्या कॅमेऱयात बंदिस्त केली आहेत.
‘स्पेशल 26’, ‘धोनी’ व अनेक उत्तम चित्रपटांचे लेखक-दिग्दर्शक नीरज पांडे आणि ‘महारथी’, ‘नाम शबाना’सारख्या गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक शिवम नायर या दोघांनी मिळून या वेब सीरिजचे दिग्दर्शन अत्यंत प्रभावीपणे केले आहे.
या वेब सीरिजचा मुख्य पात्र हिम्मत सिंह लोकांच्या मनात एवढा भरला की, हिम्मत सिंह कोण होता? तो कसा इतक्या मोठय़ा पदावर पोहोचला? याची लोकांमध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली. प्रेक्षकांच्या कुतूहलापोटी हिम्मत सिंहची माहिती घेऊन 12 नोव्हेंबर 2021 ला 4 भागांची ‘स्पेशल ऑप्स-1.5’ ही मालिका आली ज्याला मुख्य मालिकेची पूर्वकथा म्हणता येईल. यावरूनच ‘स्पेशल ऑप्स’च्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. जर तुम्ही ही वेब सीरिज अजून बघितली नसेल तर वेळ दवडू नका, लगेच बघा.
[email protected]
(लेखक सिनेदिग्दर्शक व पटकथाकार आहेत)