बॅडमिंटन प्रशिक्षकाने प्रशिक्षणादरम्यान एका 10 वर्षीय मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याप्रकरणी पोक्सो न्यायालयाने त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. ही घटना जुलै 2019 मध्ये मुलुंड येथे घडली होती.
2019 साली सदर पीडित मुलगी मुलुंड येथील एका क्लबमध्ये बॅडमिंटन शिकायला जात होती. 10 जुलै 2019 रोजी प्रशिक्षणादरम्यान तिच्या प्रशिक्षकाने पीडित मुलीला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. घाबरलेल्या मुलीने घरी आल्यानंतर तिच्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. संतापलेल्या कुटुंबीयांनी तत्काळ क्लबमध्ये धाव घेतली आणि मुख्य प्रशिक्षकाला जाब विचारला, तर त्याने उडउडवीची उत्तरे दिली आणि पीडितेला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला.
26 वर्षीय प्रशिक्षकाला या घटनेबद्धल विचारले असता. त्याने सांगितले की, मुलगी सुचनांचे पालन करत नव्हती त्यामुळे तिला शिकवत असताना तिच्या शरीराला स्पर्श झाला होता. पीडितेला केलेला स्पर्श हा प्रशिक्षण आणि शिक्षेचा भाग होता असे स्पष्टीकरण त्याने दिले होते. यावर सदर मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार तिथे सांगितला. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी प्रशिक्षकाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.
पोक्सो न्यायालयाने गुरुवारी प्रशिक्षकाला पीडितेवर लैगिंक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवले आणि आरोपीला पाच वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश कल्पना के.पाटील यांनी सुनावणीवेळी सांगितले की, सदर घटना 10 जुलै 2019 रोजी घडली आहे. घटना घडन्यापुर्वी दीड महिन्यांपासून मुलगी आरोपीकडे प्रशिक्षण घेत आहे. त्या पुढे म्हणाल्या की, जर मुलीला मागील दिड महिन्यात चुकीचा स्पर्श केला असता तर तीने आधीच तक्रार केली असती, परंतू जेव्हा तिला चुकिच्या पद्धतीने स्पर्श करण्यात आला तेव्हा तिने तक्रार केली. 10 वर्षांच्या मुलीच्या तिच्या खासगी भागांवर मारणे ही शिक्षा असूनच शकत नाही, असे न्यायाधिशांनी स्पष्ट शब्दात सांगत आरोपीला खडसावले.
आरोपीला पोक्सो अंतर्गत 11 जुलै ते 28 ऑगस्ट 2019 या कालावधीत तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्याला आता पाच वर्ष सश्रम कारावास भोगाव लागणार आहे. त्याचबरोबर आरोपीला 5000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असून ही रक्कम पीडितेला देण्याची सुचना न्यायालयाने केली आहे.