T20 World Cup 2024 Shedule : टी-20 विश्वचषकाचे बिगूल वाजले, हिंदुस्थानचा पहिला सामना होणार या दिवशी

वेस्ट इंडिज आणि अमेरिका या देशांमध्ये पार पडणाऱ्या आयसीसी T20 विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयसीसीने हे वेळापत्रक जाहीर केले असून 1 जून पासून या विश्वचषकाचा थरार अनुभवायाला मिळणार आहे. 29 दिवस चालणाऱ्या या विश्वचषकात एकूण 55 सामने खेळले जाणार असून यात सर्वाधिक उत्सुकता ही हिंदुस्थान पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांच्या सामन्यासाठी आहे.

या वर्षी जूनमध्ये होणारा ICC T20 विश्वचषक वेस्ट इंडीज आणि अमेरिका या दोन देशांमध्ये पार पडणार आहे. यासाठी वेस्ट इंडीज आणि अमेरिकेतील 9 मैदाने सज्ज आहेत. टी20 विश्वचषक 2024 चा सलामीचा सामना 1 जून रोजी यजमान अमेरिका आणि कॅनडा यांच्यात रंगणार आहे.

विश्वचषकात संघांची विभागणी चार गटांमध्ये करण्यात आली आहे. हिंदुस्थानचा समावेश अ गटात करण्यात आला आहे. हिंदुस्थानसोबत अ गटात पाकिस्तान, आयर्लंड, अमेरिका आणि कॅनडा या देशांचा समावेश आहे. हिंदुस्थानचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात 9 जून रोजी हिंदुस्थान पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी भिडेल. टीम इंडिया साखळी फेरीतील तिसरा सामना 12 जून रोजी अमेरिकेविरुद्ध खेळेल आणि शेवटचा सामना 15 जून रोजी कॅनडाविरुद्ध होईल.

टी20 विश्वचषकाची गटवार विभागणी पुढीलप्रमाणे असेल

ग्रुप ए- हिंदुस्थान, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, यूएसए
ग्रुप बी- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
ग्रुप सी- न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ग्रुप डी – दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांग्लादेश, नेदरलँड, नेपाळ

आगामी टी20 विश्वचषक स्पर्धा मागील टी20 विश्वचषकापेक्षा वेगळी असणार आहे. या टी20 विश्वचषकात पात्रता फेरी खेळली जाणार नाही किंवा सुपर-12 टप्पाही होणार नाही. गेल्या टी20 विश्वचषकात एकूण 16 संघांनी भाग घेतला होता, त्यापैकी 8 संघांना सुपर-12 टप्प्यासाठी थेट प्रवेश मिळाला आणि पात्रता फेरीतून चार संघांनी सुपर-12 मध्ये प्रवेश केला होता.