Tata Marathon 2024 – यंदाही इथियोपियाचे खेळाडू विजेतेपदाचे प्रबळ दावेदार, आंतरराष्ट्रीय एलिट गटात मात्र चुरस

जगभरात मानाची समजली जाणारी टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा यंदा 21 जानेवारी रोजी होत आहे. या स्पर्धेत गतविजेते आणि विक्रमवीर (इव्हेंट रेकॉर्ड होल्डर) इथिओपियाचे रनर लेमी बेर्हानू आणि अँकियालेम हेमनोट यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. कारण लेमी बेर्हानू आणि अँकियालेम हेमनोट हे दोघे जेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहेत. मात्र, दरवर्षी प्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय एलिट गटात मोठी चुरस पाहायला मिळेल.

टाटा मुंबई मॅरेथॉन ही 405,000 अमेरिकन डॉलर बक्षीस असणारी मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अॅथलिट जेतेपद पटकावण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होतात. पुरुष आणि महिला गट विजेत्यांसाठी बक्षीसाची रक्कम समान आहे. प्रत्येक रेसमधील विजेत्यांना अनुक्रमे प्रथम येणाऱ्याला 50,000, द्वितीय 25,000 आणि तृतीय 10,000 अमेरिकन डॉलर अशी भरघोस बक्षिसांची रक्कम मिळणार आहे. तसेच, स्पर्धेत विक्रम रचणाऱ्या खेळाडूंना 15,000 अमेरिकन डॉलर असा भरघोस बोनस दिला जाणार आहे.