शिवडी-न्हावा शेवा सेतूवर 250 रुपये टोल

शिवडी ते न्हावा शेवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) म्हणजेच अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूवरून प्रवासासाठी टोल लावू नये, अशी विविध स्तरांवरून जोरदार मागणी होत असतानाही राज्य शासनाने या मार्गावरून प्रवासासाठी 250 रुपये टोल लावण्याचा निर्णय आज घेतला.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयात पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूसाठी टोल निश्चित करण्यात आला असून सर्वसाधारणपणे टोल आकारणीच्या नियमाप्रमाणे वाहनांसाठी येणाऱया दरापेक्षा 50 टक्के कमी दराने टोल आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा राज्य शासनाने केला. एक वर्षानंतर आढावा घेऊन टोलबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.

नेहमीच्या प्रवाशांना सवलत

कारसाठी 500 रुपयांऐवजी 250 रुपये टोल आकारण्यात येणार आहे. वारंवार प्रवास करणाऱया प्रवाशांकरिता परतीचा पास देण्यात येणार आहे. त्यात एकेरी टोलच्या दीड पट, दैनिक पासासाठी एकेरी टोलच्या अडीच पट आणि मासिक पासासाठी एकेरी टोलच्या पन्नास पट अशी सवलत देण्यात आलेली आहे.

मुंबई-पनवेल दीड तास वाचणार

ट्रान्स हार्बर लिंकमुळे पनवेलपासून दक्षिण मुंबईच्या दिशेने ये-जा करणाऱया वाहनांचे सुमारे 15 किलोमीटर इतके अंतर कमी होणार असून दीड ते दोन तासांचा वेळ वाचणार आहे. इंधनावरील खर्चातही किमान 500 रुपयांची बचत होईल, असे सांगण्यात येते. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी 21 हजार 200 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी 15 हजार 100 कोटी रुपये कर्ज घेण्यात आले आहे.

ध्वनी संरक्षक आणि पारदर्शक अडथळे

शिवडी येथे दरवर्षी परदेशातून फ्लेमिंगो पक्षी येतात. त्यांना या मार्गावरील वाहनांच्या आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून सेतूच्या दोन्ही बाजूने ध्वनी संरक्षक लावण्यात आले आहेत. तसेच या सेतूमार्गाजवळ असणाऱया भाभा अणु संशोधन पेंद्र आणि माहुल येथील तेल शुद्धीकरण पेंद्राच्या 4 ते 10 किलोमीटरच्या अंतरामध्ये पारदर्शक अडथळे बसवण्यात आले आहेत.