राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मार्ग ठरला; महाराष्ट्रात पाच दिवस

लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेस खासदार राहुल गांधी पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेवर जाणार आहेत. ही यात्रा 14 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या यात्रेच्या नावात बदल करण्यात आला असून आता ही यात्रा ‘भारत जोडो न्याय यात्रा’ असणार आहे, अशी माहिती काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी दिली. याआधी या यात्रेचे नाव ‘भारत न्याय यात्रा’ असे होते. ही यात्रा महाराष्ट्रात पाच दिवस असणार असून मालेगाव, नाशिक, ठाणे आणि मुंबईतून जाणार आहे.

14 जानेवारीला या यात्रेचा शुभारंभ दुपारी 12 वाजता मणिपूरची राजधानी इंफाळपासून सुरू होईल. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे या यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील, अशी माहिती जयराम रमेश यांनी दिली. राहुल गांधी 67 दिवसात 6713 कि.मी.चा प्रवास पूर्ण करतील. ही यात्रा महाराष्ट्रातील मालेगाव, नाशिक, ठाणे, मुंबई असा 5 दिवस प्रवास करणार आहे. दिल्लीत आज काँग्रेस मुख्यालयात झालेल्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मणिपूर ते मुंबई या दरम्यान जाणाऱ्या भारत जोडो न्याय यात्रेवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या वेळी काँग्रेसचे सर्व प्रदेश अध्यक्ष उपस्थित होते.