खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणात मोक्काअंतर्गत कारवाई केलेली असतानादेखील पोलिसांनी वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने कुख्यात गुंड बंडू आंदेकर याच्यासह सहाजणांना विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी जामीन मंजूर केला आहे. खुनासारखा गंभीर गुन्हा दाखल असतानादेखील पोलिसांची तत्परता दिसून आली नाही. पोलिसांची ही निष्क्रियता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे, अशा शब्दांत न्यायालयाने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले आहेत.
सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, पुराराम गुज्जर, आकाश खरात अशी जामीन मिळालेल्यांची नावे आहेत. समर्थ पोलिसांनी 3 ऑक्टोबर 2023 रोजी निखिल आखाडे यांचा खून, तर अनिकेत दुधभाते यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी या सहाजणांना अटक केली होती. अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील यांनी त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार समर्थ पोलिसांनी 28 डिसेंबर 2023 रोजी आरोपींवर मोक्काअंतर्गत कारवाई केली.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी 90 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणे आवश्यक होते. अथवा मोक्का कलम 21 नुसार दोषारोपपत्र दाखल करण्यास मुदत घेणे आवश्यक होते. मात्र, पोलिसांनी दोन्ही गुह्यांत वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्याने आरोपींतर्फे अॅड. बिलाल शेख यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला. पोलिसांनी वेळेत दोषारोप दाखल न केल्याने आरोपींना जामीन द्यावा, असा युक्तिवाद अॅड. शेख यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने जामीन मंजूर केला. तसेच पोलिसांच्या कामावर ताशेरे ओढले.