श्रीरामावरील वक्तव्यावर आव्हाडांकडून दिलगिरी

प्रभू श्रीराम मांसाहारी होते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी केले होते. त्यावर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. आज आव्हाड यांनी आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली.

शिर्डीत पत्रकारांशी बोलताना आव्हाड म्हणाले, मी कुठलेही भाष्य अभ्यासाशिवाय केलेले नाही. पण आजकाल अभ्यासाला नाही, भावनांना महत्त्व आहे. जर माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो.

रोहित पवारांचा सल्ला झोंबला

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’द्वारे नाराजी व्यक्त केली. ‘‘आज नको त्या विषयावर वाद ओढावून घेण्यापेक्षा बेरोजगारी, ढासळलेली कायदा-सुव्यवस्था, महिलांची सुरक्षितता, शेतीमालास भाव नसणे, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवणे, जाती-जातींमध्ये तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची गरज आहे. देव आणि धर्म प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय आहे. याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कोणीही त्याचे राजकारण करू नये,’’ असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. यावर पत्रकारांनी प्रश्न विचारताच आव्हाड म्हणाले, ‘‘रोहित पवार काय बोलतात त्याकडे मी फार लक्ष देत नाही. अबुधाबीत जाऊन बोलणे सोपे आहे. ते अजून लहान आहेत. त्यांची आमदारकीची पहिली टर्म आहे.’’