आठवडय़ात लेखी आश्वासन द्या… अन्यथा पुन्हा राज्यभर आंदोलन! अंगणवाडी सेविकांचा राज्य सरकारला अल्टीमेटम

हक्काच्या मागण्यांसाठी आझाद मैदानात बुधवारपासून अंगणवाडी सेविकांचे ‘गुलाबी वादळ’ धडकल्यानंतर  आज दुसऱ्या दिवशीही ‘मिंधे’ सरकारने केवळ आश्वासनावर बोळवण केल्याने आंदोलकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे  आठवडाभरात लेखी आश्वासन द्या अन्यथा पुन्हा आझाद मैदानासह राज्यभरात जोरदार आंदोलन करण्यात येईल, असा अल्टीमेटम महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीने राज्य सरकारला दिला आहे. आझाद मैदानावरील ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले असले तरी राज्यभर संप आणि तालुका, जिल्हा पातळीवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचे कृती समितीने आज स्पष्ट केले आहे.

राज्यातील अंगणवाडी सेविका आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या 32 दिवसांपासून आंदोलन करीत असताना ‘मिंधे’ सरकारने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविकांच्या संतापाचा कडेलोट झाल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानात बुधवारपासून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी कृती समितीसोबत चर्चा केली. यावेळी केवळ आश्वासन देत पगार वाढवण्यासही नकार दिल्याने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर दुसऱ्या दिवशीही शिष्टमंडळाने सचिव महिला बालविकास सचिवांसोबत भेट घेऊन चर्चा केली. मात्र वेतनाबाबत कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही. यानंतर आझाद मैदानात मंत्री महाजन यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. यानंतर कृती समितीने बैठक घेऊन भूमिका स्पष्ट केली. यावेळी राजेश सिंग, शुभा शमिम, भगवान देशमुख, दिलीप कुटाणे, जीवन सोरडे, माधुरी क्षीरसागर, सुवर्णा तळेकर, अरमायती इराणी उपस्थित होते. दरम्यान, आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अंगणवाडी सेविकांची भेट घेऊन संवाद साधला.

दडपशाहीला घाबरणार नाही!

आठवडाभरात निर्णय झाला नाही तर मुंबईत पुन्हा आंदोलन सुरू होईल. यावेळी दोन लाख अंगणवाडी सेविकांसोबत 84 हजार आशा सेविकाही सहभागी होतील. सरकारच्या दडपशाहीला घाबरणार नाही, असा इशारा कृती समितीने दिला.

 शिवसेना अंगणवाडी सेविकांच्या पाठीशी

आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी आंदोलकांची भेट घेऊन संवाद साधला आणि मागण्या मान्य होण्यासाठी शिवसेना अंगणवाडी सेविकांच्या लढय़ासोबत राहील, असे आश्वासनही दिले.