हनुमान चालिसा पठण प्रकरण- कोर्ट म्हणजे गंमत वाटली का? राणा दाम्पत्याला न्यायालयाने फटकारले

दोन वर्षांपूर्वी हनुमान चालिसा पठणचा दिखावा करणाऱ्या राणा दाम्पत्याला गुरुवारी विशेष सत्र न्यायालयाने चांगलेच फटकारले. कोर्ट म्हणजे गंमत वाटली का, असा खोचक सवाल करीत न्यायालयाने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना 11 जानेवारीला हजर राहण्याचे सक्त आदेश दिले. पुढील सुनावणीला हजर न राहिल्यास अजामीनपात्र वॉरंट बजावू, असा सज्जड दमही न्यायालयाने दिला.

विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे ही सुनावणी झाली. शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्याबाहेर राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा पठण करण्याचा दिखावा केला होता. याप्रकरणी दोघांना अटक झाली होती. या प्रकरणात दोषमुक्ततेसाठी दोघांनी केलेला अर्ज न्यायालयाने अलीकडेच फेटाळला. त्यामुळे मोठा झटका बसल्यानंतर राणा दाम्पत्य गुरुवारी न्यायालयात गैरहजर राहिले. सत्र न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी दाम्पत्याने दोन आठवडय़ांचा वेळ मागितला. त्यावर न्यायाधीश संतापले. तुम्हाला न्यायालय म्हणजे गंमत वाटली का? सुनावणीच्या तारखेला हजर राहण्याचे गांभीर्य नाही का?, अशी प्रश्नांची सरबत्ती करीत न्यायालयाने दाम्पत्याला फटकारले. दोषमुक्ततेचा अर्ज फेटाळल्याने गुरुवारी आरोप निश्चित केले जाणार होते. मात्र आरोपींच्या गैरहजेरीमुळे आरोप निश्चित करता न आल्याने न्यायालयाने संताप व्यक्त केला.

अजामीनपात्र वॉरंटची टांगती तलवार

राणा दाम्पत्याने हजेरीसाठी दोन आठवडयांची मुदत मागत आरोप निश्चिती टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाने दोन आठवडय़ांची विनंती अमान्य करीत त्यांच्या मनसुब्याला झटका दिला. 11 जानेवारीच्या पुढील सुनावणीला दोघांनाही हजर राहावेच लागेल, अन्यथा अजामीनपात्र वॉरंट बजावू, अशी कठोर तंबी न्यायालयाने दिली. त्यामुळे वॉरंटची टांगती तलवार उभी राहिली आहे.