एकजुटीनं पेटलं रान, तुफान आलंया! क्रीडा खात्याविरुद्ध आज सर्वसंघटनीय निषेध सभा

राज्याच्या क्रीडा खात्याच्या मूर्खपणामुळे राज्यातील क्रीडा क्षेत्राचे वातावरण अक्षरशः ढवळून निघाले असून सर्व संघटनांच्या एकजुटीने रान पेटल्याचे चित्र उभे राहिले आहे. कोणतेही कारण न देता, खेळाडू आणि संघटनांशी कसलीही चर्चा न करता कॅरम, शरीरसौष्ठव, पॉवरलिफ्टिंग, बिलियर्ड्स व स्नूकर, नौकानयन, गोल्फ आणि अश्वारोहण या सात खेळांसह जिम्नॅस्टिक्समधील ऍक्रोबॅटिक्स आणि एरोबिक्स या उपप्रकारांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या यादीतून वगळण्याच्या सरकारी प्रताप करणाऱया राज्याच्या क्रीडा खात्याचा तीव्र निषेध करण्यासाठी अन्यायग्रस्त सर्व संघटना एकत्र उभ्या राहिल्या आहेत. त्यांनी क्रीडा खात्याचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी आज शुक्रवार, 5 जानेवारीला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील श्री समर्थ व्यायाम मंदिरात सायंकाळी 6 वाजता सर्वसंघटनीय निषेध सभेचे आयोजन केले आहे.

शासनाच्या क्रीडा खात्याने 29 डिसेंबर 2023 रोजी काढलेल्या सरकारी आदेशानुसार सात खेळ आणि दोन उपप्रकारातील खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कारापासून वंचित राहावे लागणार असल्यामुळे राज्यात क्रीडा खात्याविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. क्रीडा खात्याच्या गोंधळाचे वातावरण निर्माण करणाऱया निर्णयामुळे भविष्यात या खेळातील खेळाडूंच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा सरकारी निर्णय नसून तो जुलमी कारभार असल्याची संतप्त प्रतिक्रिया सर्वच क्रीडा क्षेत्रातून उमटत आहेत. क्रीडा खात्याला आपला निर्णय मागे घेत खेळ आणि खेळाडूंवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी अन्यायग्रस्त सर्व खेळांच्या राज्य संघटनांनी बुधवारीच क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांना निषेधाचे पत्र दिले होते.

घेतल्याशिवाय जाणार नाही…

क्रीडा खात्याच्या निर्णयामुळे राज्यातील क्रीडा क्षेत्रात असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे खेळाडू आणि संघटक सारेच आक्रमक झाले आहेत. आपला पुरस्कार हिसकावून घेणाऱया क्रीडा खात्याकडून आपला पुरस्काराचा हक्क घेतल्याशिवाय जाणार नसल्याची भूमिका सर्वानी व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि क्रीडा खात्याला फार मोठय़ा रोषाला सामोरे जावे लागणार आहे. निषेधाच्या या बैठकीला जय कवळी, नामदेव शिरगावकर, संजय मोरे, उदय देशपांडे, संजय शेटे, देवेंद्र जोशी, संजय सरदेसाई यांच्यासह सर्वच खेळांतील दिग्गज खेळाडू, पदाधिकारी, पंच आणि क्रीडा संघटक उपस्थित राहणार आहेत.