रत्नागिरी जिल्ह्यात मत्स्य उत्पादन घटले; या वर्षात केवळ 62 हजार 708 मेट्रिक टन उत्पादन

कोकण किनारप‌ट्टीवर मासेमारी हा मुख्य व्यवसाय असला तरी गेल्यावर्षीपासून मासेमारीचे उत्पादन घटले आहे. 2022-23 या वर्षात केवळ 62 हजार 708 मेट्रिक टन मत्स्य उत्पादन झाले आहे. हे उत्पादन 2021-22 मध्ये 1 लाख 1 हजार 228 मेट्रिक टन होते. या वर्षात त्यात घट झाली आहे.

कोकण किनारप‌ट्टीवर केवळ मच्छिमारच नव्हे तर मच्छिवाहतूक करणारे ट्रकचालक, बर्फ कारखानावाल्यांपासून मच्छिविक्रेत्या महिलांपर्यंत सर्व आपला उदरनिर्वाह करतात. माशांचे उत्पादन घटल्यापासून या सर्वांनाच आर्थिक फटका सोसावा लागत आहे. 2020-21 ला कोरोना काळात मासेमारी बंद होती. त्यामुळे त्यावेळी मत्स्यउत्पादन कमी होते. 2020-21 ला 65 हजार 374 मेट्रिक टन मत्स्यउत्पादन होते. 2021-22 ला मत्स्यउत्पादनामध्ये वाढ झाली. त्यावर्षी 1 लाख 1 हजार 228 मेट्रिक टन मत्स्यउत्पादन होते. 2022-23 या वर्षात मत्स्यउत्पादन कमालीचे घटले.

2022-23 मध्ये 62 हजार 708 मेट्रिक टन मत्स्यउत्पादन झाले. यामध्ये मंडणगड तालुक्यात 474 मेट्रिक टन, दापोलीमध्ये 12 हजार 437 मेट्रिक टन, गुहागर तालुक्यात 1 हजार 542 मेट्रिक टन, रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 42 हजार 378 मेट्रिक टन, राजापूर तालुक्यात 5 हजार 877 मेट्रिक टन उत्पादन झाले. जिल्ह्यामध्ये एकूण 2,520 नौका मच्छिमारी करतात. त्यामध्ये यांत्रिकी पध्दतीने मासेमारी करणाऱ्या 2074 नौकांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात घटलेले मत्स्यउत्पादन ही चिंतेची बाब आहे.