महाराष्ट्रात अनेक अडचणी, आपली लढाई दिल्लीतील अदृश्य शक्तीशी; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे ज्योत निष्ठेची- लोकशाहीच्या संरक्षणाची अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन दिवसीय शिबिराला 3 जानेवारीपासून सुरुवात झाली होती. या शिबिराच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी शिबिराला संबोधित करतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी अजित पवार यांच्या विरोधात बोलावं, असं अनेकाना वाटतं. पण, मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही. जो गरीब आहे, लाचार आहे, त्याच्याशी आपल्याला लढायचं नाही. तर आपल्यापेक्षा वरचढ असलेल्या लोकांशी आपली लढाई आहे. दिल्लीत बसलेल्यांशी आपल्याला संघर्ष करायचा आहे. आपली लढाई यांच्याशी नाही आहे. कारण, दिल्लीने डोळे वटारले के ते घाबरतात असा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माझ्यावर ईडी, सीबीआय नसल्यामुळं मला दादांसारखी दिल्लेश्वरांची भीती वाटत नाही. मेरी इनानदारी मेरी ताकद आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. स्वत:च्या कर्तृत्वावर आमच्या आजी तेव्हा पुणे बोर्डावर निवडून आल्या होत्या. तेव्हा त्यांच्यामागे कुठला राजकीय वारसा नव्हता. तसंच 38 व्या वर्षी स्वत:च्या हिमतीवर शरद पवार मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी त्यांच्यामागे माझ्या आणि अजितदादांसारखी घराणेशाही नव्हती, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण यांची भूमिका भाजपला आणि आरएसएसला पुरक नव्हती. त्यांचं आणि आरएसएसकधी जमलं नाही. मात्र, आज यशवंतराव चव्हाणाचा आदर्श सांगणारे भाजपच्या वळचणीला गेले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

आज देशात दडपशाहीचे वातावरण- जयंत पाटील
पुढील काळात अनेक गोष्टी होणार आहेत. प्रचंड भपकेबाजपणा समोरच्या बाजूला दिसणार आहे. त्यांचं सरकार असल्यामुळे सरकारचे व्यासपीठ हे पक्षाचे व्यासपीठ असे समजून ते देशात राज्यात वागताहेत पण त्यांच्या भपकेबाजीला घाबरु नका. कारण सत्ता असते तेव्हा असा फुकवटा असतो, असे शिबिराच्या अंतिम दिवशी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले की, तसेच हा फुकवटा त्यांच्या विजयासाठी नाहीतर कोण निवडून येणार आहे त्याचा अंदाज घेण्यासाठी असतो. त्यामुळे आपण ठामपणे निर्णय घेऊन काम करणं सुरु केलं पाहिजे. सध्या दडपशाहीचं वातावरण असून संसदरत्नांवर कारवाई झाली आहे. संसदेच्या सुरक्षेप्रकरणी आवाज उठवल्याने देशातले 143 खासदारांना सत्ताधाऱ्यांनी घरी पाठवलं आहे. सुरक्षेच्या प्रश्नावरुन चर्चेची मागणी केली हा त्यांचा गुन्हा काय? चर्चा होऊ द्यायचीच नाही असे चालवलं जात आहे. देशात कधीच अशी निलंबनाची कारवाई झाली नव्हती. पण आता निलंबन करायचं आणि सरकार चालवायचं ही नवी पद्धत सुरु झाली असल्याचंही हल्लाबोल जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर केला. राम सर्वांचाच आहे त्यामध्ये अडकू नका. राम आपला नाही असं नाहीये. आपणही रामभक्त आहोत पण त्याच्यात अडकू नका. सरकारमध्ये बसलेल्या लोकांसमोर लोकांच्या उणीवा काय आहेत त्या मांडण्याचं काम करण्याचं आवाहन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

देशावर 205 लाख कोटींचं कर्ज असून एवढं कर्ज आपल्या डोक्यावर असेल तर आपल्या देशाती अवस्था बांग्लादेश आणि श्रीलंकेसारखी होणार असल्याचंही भाकीत जयंत पाटलांनी केली आहे. तसेच देशात कुटुंब बचतीमध्ये मागील 10 वर्षांच सर्वांत निच्चांकी वर्ष सध्याचं असून अर्थव्यवस्थेवर सरकार बोलत नाही, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.

भाजपाच्या पक्ष फोडणीला नेते बळी पडले, महाराष्ट्राच्या दृष्टीने खेदजनक- राजेश टोपे
राजकारणातील कुठेतरी निष्ठा व नैतिकता लोप पावत असताना आजचा हा विचार फार महत्वाचा आहे. सह्याद्री कधी हिमालयापुढे झुकला नाही, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्याला स्वाभिमानाने जगण्याचा विचार दिला. भाजपाच्या पक्ष फोडणीला नेते बळी पडले हे महाराष्ट्राच्या अस्मितेच्या दृष्टीने अत्यंत खेदजनक बाब असल्याचं माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांनी सांगितले.

राजेश टोपे म्हणाले की, राजकारणाच्या गढूळ वातावरणात निष्ठावान व चांगले लोक राहावेत हे मतदार बघत आहेत. निष्ठेच्या दृष्टिकोनातून आपल्या पक्षाचे महत्व वेगळे आहे, त्यामुळे आपल्याला निष्ठेची ज्योत तैवत ठेवणे आवश्यक आहे. आपल्या पक्षाच्या दृष्टीने शक्ती स्थळ व आश्वासक चेहरा हे शरद पवार साहेब आहेत व तेच या क्षेत्रातले बाप माणूस आहेत. शरद पवार साहेब एक व्यक्ती नाहीत तर ती एक विचारधारा आहे, त्यामुळे या विचारांना अनुसरून आपण आपल्या पक्षाला विजयाकडे घेऊन जायचे आहे. शरद पवार नेहमी शाहू- फुले- आंबेडकर यांच्या विचारांना धरून काम केल्याचं राजेश टोपे म्हणाले.

राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही – अनिल देशमुख
आपल्या सर्वांना कल्पना आहे की, गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचे राजकारण चालू आहे व ते महाराष्ट्रातील जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. शेतकरी अडचणीत असताना सुद्धा हे सरकार त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक, कांदा उत्पादक, संत्रा उत्पादक शेतकरी आज प्रचंड अडचणीत आहे पण या झोपलेल्या सरकारचे त्यांच्याकडे लक्ष नाही. विजेचा, पिक विम्याचा प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये आहे पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही.

पंतप्रधानांनी एक स्टेटमेंट दिलं की, शरद पवार सहाब ने क्या किया? पण पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एका मुलाखतीत साहेबांच्या कामांचे कौतुक केले होते व त्यांना शेतकऱ्यांच्या मसीहा असे म्हटले होते. अजित दादांनी केलेली गद्दारी ही लोकांना पटलेली नाही, लोक त्याचा योग्य वेळी हिशोब घेतील. पुढील काळामध्ये आपल्याला सत्ताधाऱ्यांचे खोटी आश्वासने लोकांपुढे आणणे गरजेचे आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही, व त्यासाठी आपल्याला एकत्रित मिळून काम करणे अत्यंत गरजेचे आहे असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

राजकीय लोकांना ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून त्रास देत आहेत व राजकीय विरोधकांना थेट शत्रू ठरवले जात आहे. महाराष्ट्रात कधी नव्हता तो राजकीय द्वेषाचा पायंडा पाहायला मिळत आहे, अनेक राज्यात राजकीय विरोधकांचे तोंड दाबण्याचे प्रयत्न हे सरकार करत आहे. पोलिसांना हाताशी घेऊन माझ्यावर शंभर कोटींचे आरोप करण्यात आले, माझ्या घरावर 120 धाडी पडल्या व 210 लोकांची चौकशी झाली. चौकशीअंती परमवीर सिंग यांनी कोर्टामध्ये एफिडेविट दिला की अनिल देशमुख यांच्या आरोपांवर माझ्याकडे कोणतेही पुरावे नाहीत व ऐकीव माहितीच्या आधारे त्यांच्यावर आरोप केले त्यानंतर मला बेल मिळाली व खोट्या प्रकरणात मला फसवण्यात आलं आणि १४ महिने मला तुरुंगात पाठवलं. मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये जिथे अजमल कसाबला ठेवले होते तिथे मला ठेवण्यात आले. आपल्या सर्वांना एकत्रित राहून पुढील काळामध्ये या सरकारला लोकसभा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पराभूत करण्यासाठी प्रयत्न करू असे अनिल देशमुख म्हणाले.