आमचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही आणि आमचे मुख्यमंत्री पहिली सही अंगणवाडी सेविकांचा प्रश्न सोडवण्यासाठी करतील, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शिर्डी येथे दोन दिवसांच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या समारोपावेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात माझी लढाई कुणाशीही नाही. दिल्लीच्या अदृश्य शक्तीविरोधात आपण लढत आहोत आणि लढत राहू. मला कुणाचीही भिती वाटत नाही. माझी ताकद इमानदारी आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. तुम्हाला लोकप्रतीनिधी की बिझनेसमॅन व्हायचंय हे ठरवा.आपल्याला पक्ष पुढे घेऊन जायचाय, राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत त्याची सोडवणूक आपल्याला करायची आहे. त्यासाठी आपल्याला सरकार आपले आणले पाहिजे आणि आपलेच सरकार येणार आहे, असे त्या म्हणाल्या.
मराठा धनगर मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न जो सोडवेल त्या पक्षाच्या पाठीशी राष्ट्रवादी राहील. हे छत्रपतींची शपथ घेतात आणी आरक्षण देत नाही.मी सुशिक्षित आहे. मी राजकारणात काय मागितलं…? मी कधीही इतर गोष्टीकडे लक्ष दिले नाही.माझ्यावर पवार कुटूंबाचे संस्कार आहेत..आज कुणीतरी त्याचा गैरफायदा घेतंय, असा टोलाही त्यांनी लगावला. मी राजकारणात तुमच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी आले आहे. महाराष्ट्र सध्या अडचणीत आहे. या शिबीरात राजकीय आणि भावनिक विषयावर चर्चा झाली. महाराष्ट्राच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान पाण्याचे आहे. सरकार याबाबत असंवेदनशील आहे. खोके सरकार केवळ पक्ष आणि कुटूंब फोडण्यात व्यस्त आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला.