मुंबई – गोवा महामार्गावरील पेणजवळ असलेल्या तरणखोप गावाच्या हद्दीत पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने अवैध डिझेल तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्याकडून 6 डिझेलचे अनधिकृत टँकरसह दिड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे मुंबई गोवा महामार्गावर अवैध धंदे करीत असलेल्यांचे धाबे दणाणले आहेत. मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून त्यातील एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.
मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास तरणखोप येथील हॉटेल शुभलक्ष्मी समोरील मोकळ्या जागेत टँकरमधून डिझेलची अवैध्य वाहतूक आणि साठवणूक होत असल्याची माहिती मिळाली होती. या नंतर पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता विभागाच्या उपनियंत्रक मधुकर बोडके, सहाय्यक नियंत्रक विनायक सावंत, निकम, सुधीर गव्हाणे, प्रकाश पराते, राजू भेले, मच्छिंद्र कुटे, दीपक कदम, विवेक त्रिभुवन, सागर वराळे या पथकाने सापळा रचत तरणखोप येथील हॉटेल शुभलक्ष्मी येथे पाळत ठेवली.
डिझेल तस्करी करण्यात येत असलेले सहा टँकर व मोहम्मद अली मोहम्मद, लंबे या दोन टँकर चालकांना रंगेहाथ पकडण्यात आले. हे टँकर हे अलिबाग येथील आरसीएफ कंपनी जवळील समुद्रामधील बोटीतून अवैधरित्या डिझेल घेऊन त्याची तस्करी करीत होते. याप्रकरणी एकूण एकुण 1 कोटी 43 लाख 6 हजार रुपयांचा डिझेल व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. डिझेल साठवणूक व वाहतुक व्यवसायाचे मालक महंमद अनीस खान व मॅनेजर अब्दुल शेख यांच्यासह इश्तीयाक, राजू पंडित, उस्मानसह 4 टँकर चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर पेण पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता 1860 / 420, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 / 3,7,8, पुरवठा नियमन व वितरण व गैर व्यवहार प्रतीबंध 2 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डिझेल तस्करी प्रकरणात केवळ छोट्या-मोठ्या आरोपींवर कारवाई करण्यात येत असून प्रत्यक्षात पडद्याआड असलेले राजकीय नेते व त्यांच्या हस्तक, स्थानिक तस्कर यांना मात्र अभय देण्यात आल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा समन्वयक नरेश गावड यांनी केला असून या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी होऊन खऱ्या सूत्रदारांना गजाआड करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.