डोळा हा शरीराचा प्रमुख अवयव असून मोबाईलच्या अति व वाढत्या वापरामुळे डोळय़ाचे आजार वाढल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत. त्यामुळे पालकांनी काही ठरावीक वयात मुलांना मोबाईल वापरण्यापासून दूर ठेवणे गरजेचे आहे, अशी सूचना नेत्रशल्यविशारद ‘पद्मश्री’ डॉ. तात्याराव लहाने यांनी केली. माता यशोदा परिवाराच्या वतीने आयोजित विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
श्रीकृष्ण हरचांदे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य व स्वच्छतेचा प्रसार करणाऱ्या माता यशोदा परिवारातर्फे स्वर्गीय यशोदा रामचंद्र हरचांदे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विनामूल्य आरोग्य तपासणी शिबीर चिंचपोकळी येथे नुकतेच पार पडले. डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. डॉ. सायली लहाने, डॉ. सुमित लहाने, डॉ. शीतल लहाने, डॉ. म्रितीका सेन यांनी चष्म्याचा नंबर काढणे, मोतीबिंदू , काचबिंदू तपासणी तपासणी करून मार्गदर्शन व सल्ला दिला. डॉ. दीपक लवजी देसाई, डॉ. अरविंद जैन, डॉ. विलास वडांबे, डॉ. अमी पाटील-देसाई, डॉ. अनघ, डॉ. सिमरन आदींनी या शिबिरात सहभाग घेतला.
306 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी उप लोकायुक्त संजय भाटिया, पोलीस उपआयुक्त प्रशांत कदम, माजी आमदार दगडू सकपाळ, आमदार अॅड. आशीष शेलार, माजी नगरसेवक विनोद शेलार, विधान मंडळाचे माजी उपसचिव भाई मयेकर, ‘लालबागचा राजा’ मंडळाचे सचिव सुधीर साळवी यावेळी उपस्थित होते. श्रीकृष्ण हरचांदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाई कांबळी, विजय जाधव, संदेश गावकर, राजेंद्र पवार, प्रिया कांबळी आदींनी शिबीर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.