ट्रकचालकांच्या संपामुळे व्यवहार ठप्प; अनेक शहरात इंधनाचा तुटवडा, पेट्रोल पंपावर लागल्या रांगा

केंद्र सरकारने हिट अँन्ड रन कायद्याच्या सुधारणेविरोधात संपूर्ण देशात ट्रक चालकांनी चक्का जाम आंदोलन केले आहे. हा कायदा चुकीचा असून तो परत घेतला पाहिजे अशी मागणी करत मुंबई, इंदूरपासून दिल्ली हरियाणा, यूपीसह अनेक ठिकाणी ट्रक चालकांनी ट्रक रस्त्यावर उभे करत वाहतूक रोखली आहे. महाराष्ट्रात काही ट्रक चालकांनी आंदोलन केले आहे. या संपाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. या आंदोलनामुळे व्यवहार ठप्प झाले असून अनेक शहरात इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. तसेच अनेक पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

हिट अँड रन कायद्याद्वारे सरकारने अपघातातील वाहनचालकांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. ज्यात जर कुठलाही ट्रक अथवा डंपर चालकाने कुणाला चिरडले तर त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि 7 लाखांचा दंडही भरावा लागू शकतो. याआधी अशा प्रकरणात आरोपी ड्रायव्हरला जामीन मिळत होता त्यामुळे तो लगेच बाहेर यायचा. त्याचसोबत या सध्या 2 वर्षाची शिक्षेची तरतूद होती.

सरकारच्या या कायद्याविरोधात ट्रक चालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा कायदा कठोर आहे. सरकारने तो परत घ्यावा अशी मागणी ट्रक चालकांनी लावून धरली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले जात आहे. मुंबई, महाराष्ट्रातही हे आंदोलन पेटले आहे. सरकारच्या कायद्याविरोधात ट्रक चालक एकवटले आहेत. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

ट्रक चालकांच्या देशव्यापी संपाचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे. ट्रक चालकांच्या संपामुळे इंधन वाहतूकीसह, फळे, भाज्या आणि दूधाची वाहतूक ठप्प आहे. इंधनाच्या तुटवड्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गेल्या 3 दिवसांपासून इंडियन ऑयलच्या इंधनाचा पुरवठा करणाऱ्या वाहनांवर परिणाम झाला आहे.

महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील ट्रक चालकांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. या ट्रक चालकांनी कामबंदचा इशारा दिल्याने अनेक ठिकाणी ट्रक उभे राहिले आहेत. परिणामी, पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडर, भाजीपाला, बांधकाम साहित्य आणि किराणा सामानाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सर्वाधिक फटका इंधन वितरणाला बसला आहे. काही पेट्रोल पंपांपर्यंत ट्रक पोहोचू न शकल्याने अनेक पेट्रोल पंपांवरील इंधन संपलं आहे. त्यामुळे अनेक वाहन चालकांनी पेट्रोल पंपांवर रांगा लावल्या आहेत.

राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी पोलिसांना आदेश दिले आहेत. गॅस सिलेंडर, पेट्रोल-डिझेलसारख्या इंधनाचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी पोलिसांनी आवश्यक ती पावलs उचलण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आल्याचे वृत्त पीटीआयनं दिलं आहे. मध्य प्रदेशात वाहतूक सेवा खंडित झाल्याने प्रवाशांना एक-दीड तास बस किंवा टॅक्सीची वाट पाहावी लागत आहे. गुजरातमधील खेडा, वलसाड, गिर सोमनाथ, भरूच आणि मेहसाणा यासह अनेक जिल्ह्यांमध्ये निदर्शकांनी वाहने उभी करून आणि नाकेबंदी करून महामार्ग रोखले. त्यामुळे अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत.