अनिल अंबानीची ‘ही’ कंपनी सरकार विकत घेणार; शेअरवर झाला परिणाम

कर्जाच्या फेऱ्यात अडकेल्या अनिल अंबानींनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अनिल अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स पॉवरने अरुणाचल प्रदेशातील 1,200 मेगावॅट क्षमतेचा कलाई II जलविद्युत प्रकल्प टीएचडीसी इंडिया लिमिटेड (THDC) या सरकारी कंपनीला 128.39 कोटींना विकली आहे. याबाबतचा अधिकृत करार झाला असल्याचे समोर आले आहे.

आपल्या व्यवसायासाठी निधी उभा करण्यासाठी आपण ही कंपनी विकत असल्याची माहिती अनिल अंबानी यांनी दिली आहे. हा विक्री खरेदीचा व्यवहार रिलायन्स पॉवरची उपकंपनी कलाई पॉवर प्रायव्हेट लिमिटेड व अरुणाचल प्रेदश आणि टीएचडीसी इंडिया लिमिटेड (THDC) यांच्यात 30 डिसेंबर रोजी झाला. यादरम्यान, रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये 0.84% घसरण झाली असून शेअर 23.75 रुपयांवर स्थिरावला आहे.

करारानुसार अरूणाचल प्रदेशच्या लोहित नदी खोऱ्यावरील प्रस्तावित 1,200 मेगावॅट कलाई प्रकल्पाचे विकास हक्क आणि भौतिक मालमत्ता, डिझाईन सर्व THDC कडे हस्तांतरित केले. हा करार 128.39 कोटी रुपयांना पूर्ण झाला.

टीएचडीसी इंडिया लिमिटेड (THDC)ही नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC)च्या मालकीची एक छोटी कंपनी आहे. या कंपनीची स्थापना 1988 मध्ये झाली आहे. या कंपनीच्या माध्यामातून टिहरी हायड्रो पॉवर कॉम्प्लेक्स आणि इतर अनेक जलप्रकल्प चालवले जात आहेत.