मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत धडक देत उपोषण आणि आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत संभाजीराजे छत्रपती यांनी सरकारला इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत तारखांवर तारखा देत चालढकल करणे कुणालाही परवडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.
मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन उपोषण आणि आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाबाबत आग्रही राहिलेल्या संभाजीराजे छत्रपती यांनी टिकणारे आरक्षण म्हणजे नेमके काय, असा प्रश्न उपस्थित करत मराठा आरक्षणाबाबत केवळ तारखांवर तारखा देत चालढकल करणे आता कुणालाही परवडणार नाही, असा इशारा दिला आहे.
संभाजीराजे छत्रपती सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की, 2023 हे वर्ष संघर्षाचे होते. आरक्षणासाठी अनेक मराठा तरूणांनी आत्महत्या केल्या. मात्र अजूनही राज्यकर्ते समाजाची दिशाभूल करत आहेत का, असा प्रश्न पडतो. सरकार म्हणते कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता टिकणारे आरक्षण देणार. कुणाला धक्का न लावता देणार याचा अर्थ 50 % च्या वर देणार, पण यापूर्वी दोनदा असे आरक्षण टिकलेले नाही, मग नेमके आरक्षण देणार कसे, टिकणारे आरक्षण म्हणजे नेमके काय, हे सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. किमान येत्या वर्षाच्या सुरूवातीला तरी आपल्या संघर्षाला यश मिळेल, अशी अपेक्षा मराठा समाज बाळगून आहे. त्यामुळे केवळ तारखांवर तारखा देऊन चालढकल करणे आता कुणालाही परवडणार नाही, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.