राष्ट्रवादी काँग्रसचे नेते एकनाथ खडसे सातत्याने राज्य सरकारवर हल्ला चढवत आहे. खडसे- महाजन आणि फडणवीस यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. त्यातच फडणवीस यांनी गृहखाते हाती घेतल्यापासून राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदरा सुप्रिया सुळे यांनी केला होता. आता खडसे यांनी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या मुद्द्यावर पोलिसांवरच आरोप केले आहे. राज्यात गुन्हेगारी वाढत असताना पोलीस फक्त हप्ते घेण्यामध्ये व्यस्त आहेत, असा आरोप खडसे यांनी केला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात आणि आजूबाजूच्या दोन-तीन तालुक्यांमध्ये शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या वीज तारांची मोठ्या प्रमाणात चोरी होत असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. याबाबत पोलिसांकडे अनेक वेळा तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलीस नेहमीच सांगतात की, आम्ही चौकशी करीत आहोत, परंतु यामध्ये सामील असणाऱ्यांना पोलीस पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीत. पोलीस अधिकारी फक्त हप्ते घेण्यामध्ये व्यस्त असल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे.
शेतीसाठी जी वीज वापरली जाते त्याच्या तारा, वायर चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पोलीस नुसतेच सांगत आहेत की आम्ही तपास करतो आहोत. मात्र यात जे कुणी सामील आहेत त्यांना पकडण्यासाठी पोलीस कारवाई करताना दिसत नाही. मुक्ताई नगरमध्ये सट्टा, मटका, जुगार यांचे अड्डेही सुरु आहेत. पोलिसांना हप्ते घेण्यातच जास्त रस आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष देण्याची गरज आहे. छोटे मिया तो छोटे मिया बडे मियाँ सुभान अल्ला अशी पोलीस खात्याची स्थिती आहे असा हल्लाबोलही खडसेंनी केला आहे.
सध्या शेतकऱ्यांची कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. त्यासाठी पाणी जास्त वेळ उपलब्ध असावे लागते. नाहीतर शेतीचे नुकसान होते. त्याकडे लक्ष द्यायला हवे आहे. शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. तसेच पोलिसांवर हप्ते घेत गुन्हेगारीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.