सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडलेल्या जिल्ह्यातील 115 तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. दारू प्राशन करून वाहन चालवू नये असे आवाहन जिल्हा पोलिसांकडून करण्यात आले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. जिल्हा पोलिसांनी ठिकठिकाणी केलेल्या नाकाबंदीत एकुण 115 जणांना पकडण्यात आले. त्यांची तपासणी करून त्यांच्यावर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागताचे सेलिब्रेशन करण्यासाठी 31 डिसेंबर रोजी नगर शहरासह जिल्ह्यातील हॉटेल, बार आदी ठिकाणी गर्दी झाली होती. नगर शहरासह जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत 31 डिसेंबरच्या रात्री नाकाबंदी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रभारी अधिकार्यांना दिले होते. प्रभारी अधिकार्यांनी आपआपल्या हद्दीत ठिकठिकाणी नाकेबंदी केली होती. नाकाबंदीदरम्यान संशयीत वाहन चालकांची पोलिसांनी ब्रेथ अनालायझर तपासणी केली असून त्यात मद्यपान करून वाहन चालवणार्या 115 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.